

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २८ : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेनेची बंडखोरी भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या पथ्यावर पडली. मतदारसंघातील बहुरंगी लढतीत गावडे यांचा सरळ विजय झाला. मात्र मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी गावडे यांना २७ व्या फेरीपर्यंत वाट पाहवी लागली, तर शिवसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांना दुसऱ्या पसंतीची मते मिळाली. माजी आमदार दत्तात्रय सावंत यांना तिसऱ्या, तर विद्यामान आमदार जयंत आजगावकर यांना चौथ्या पसंतीक्रमांकाच्या मतांवर समाधान मानावे लागले. गावडे यांच्या विजयाने तब्बल १८ वर्षांनंतर शिक्षक मतदारसंघावर भाजपला आपला झेंडा फडविण्यात यश आले.
गावडे यांनी शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांचा तब्बल ६ हजार ७७० मतांनी पराभव केला. एकूण वैध मतांमधून २५ हजार ७५६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. त्यात गावडे यांना निर्धारित मते न मिळाल्याने २७ बाद फेऱ्यांनतर २३ हजार १७७ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी सानप यांना १६ हजार ३४७ मते मिळाली. या मतदारसंघातून आजवर निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये गावडे सर्वात तरुण उमेदवार ठरले आहेत.
शिक्षक मतदारसंघातील ६१ हजार ९४० नोंदणीकृत मतदारांपैकी ५३ हजार १८४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. बालेवाडीतील क्रीडासंकुलात मतमोजणीस मंगळवारी सकाळी आठ वाजता सुरू झाली. मात्र अंतिम निकाल येण्यास बुधवार सायंकाळी उजाडली. पहिल्या पसंतीच्या मतांत कोणत्याही उमेदवाराला विजयाचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे कमी मते असलेल्या उमेदवारांना क्रमाक्रमाने बाद करून त्यांच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीची मते मोजण्यात आली. या प्रक्रियेत गावडे यांची आघाडी कायम राहिली. सहाव्या फेरीअखेर गावडे यांची सानप यांच्यावरील आघाडी ६ हजार २७३ मतांची होती. २४ व्या फेरीअखेरही दोघांमधील अंतर जवळपास कायम होते. त्यानंतर २५ व्या फेरीत खंडेराव जगदाळे यांच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीची मते मोजण्यात आली. या फेरीत गावडे यांच्या मतांत २६५, सानप यांच्या मतांत २४०, सावंत यांच्या मतांत १४३, तर आसगावकर यांच्या मतांत १६५ मतांची भर पडली.
२६ व्या फेरीत बब्रूवाहन रोंगे यांच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीची मते मोजण्यात आली. या फेरीत गावडे यांना ४३७, सानप यांना ३२५, सावंत यांना ३१७ आणि आसगावकर यांना ३४५ मते वाढली. त्यामुळे २६ व्या फेरीअखेर गावडे यांची सानप यांच्यावरील आघाडी ६ हजार ४०२ मतांवर पोहोचली.
चौथ्या क्रमांकावर आसगावकर बाद झाले. २७ व्या फेरीअखेर गावडे यांना २० हजार ११८, सानप यांना १३ हजार ६४२, तर सावंत यांना १२ हजार ६८७ मते होती. पुढील फेरीत सावंत यांच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीची मते मोजल्यानंतर गावडे यांची मतसंख्या २३ हजार ११७, तर सानप यांची १६ हजार ३४७ झाली. या फेरीत सावंत बाद झाल्यानंतर त्यांच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीची २ हजार ९९९ मते गावडे यांना, तर २ हजार ७०५ मते सानप यांना मिळाली. त्यामुळे गावडे यांची आघाडी कायम राहिली.
१८ वर्षांनंतर भाजपला यश
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात २००८ मध्ये भगवानराव साळुंखे यांनी विजय मिळविला होता. त्यांना भाजपसमर्थित महाराष्ट्र शिक्षक परिषदेचा पाठिंबा होता. त्यानंतर २०१४ मध्ये अपक्ष दत्तात्रय सावंत आणि २०२० मध्ये काँग्रेसचे जयंत आसगावकर निवडून आले. आता गावडे यांच्या विजयामुळे १८ वर्षांनंतर भाजपला या मतदारसंघात पक्षाचा झेंडा रोवण्यात यश आले आहे. गावडे यांनी वयाच्या ३० व्या वर्षी विधान परिषदेत प्रवेश मिळविला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपूर्वी अवघे तीन दिवस त्यांची ३० वर्षे पूर्ण झाली होती. त्यांच्या रूपाने कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा पुणे शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मिळाले आहे.
भाजपलाच फायदा
सानप यांच्या उमेदवारीने महायुतीत फूट पडली होती. तरीही सानप यांनी गावडे यांना चांगलीच झुंज दिली. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना तसेच सानप यांनाही शेवटपर्यंत विजयाची खात्री वाटत होती. सानप यांच्या उमेदवारीनेच काँग्रेसला फायदा मिळेल, अशी एक अटकळ बांधली जात होती. परंतु भाजपला त्याचा फायदा झाला, तर आसगावकर यांना फटका बसला. २०२० च्या निवडणुकीत काँग्रेसचे जयंत आसगावकर यांनी तत्कालीन आमदार दत्तात्रय सावंत यांचा पराभव केला होता. आसगावकर यांना २५ हजार ९८५, तर सावंत यांना १५ हजार ३५७ मते मिळाली होती. या वेळी मात्र आसगावकर यांनी कसाबसा १० हजारांचा टप्पा गाठला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.