esakal | Pune : टेमघर धरण झाले ' ओव्हर फ्लो '
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : टेमघर धरण झाले ' ओव्हर फ्लो '

sakal_logo
By
धोंडिबा कुंभार

पिरंगुट : पुणे शहराला वरदान ठरलेले आणि मुठा खोऱ्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी लाभदायक झालेले टेमघर धरण काल रविवार दिनांक १२ रोजी रात्री साडे अकरा वाजता पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने हे धरण 'ओव्हर फ्लो ' झाले असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे पुणेकरांसह मुठा खोऱ्यातील पाणी टंचाई दूर होणार आहे. गेल्यावर्षी हे धरण ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस (दि. २९ ऑक्टोबर २०२०) रोजी भरले होते.

बांधकाम पूर्ण झाल्यापासून हे धरण ऑक्टोबरमध्ये शंभर टक्के भरण्याची गेल्यावर्षीची ती पहिलीच वेळ होती. सध्या या धरणामध्ये ३.७१ टीएमसी म्हणजेच १०० टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. सन २०१९ मध्ये या धरण क्षेत्रात ३३०० मीमी पाऊस झाल्यावर हे धरण ५ ऑगस्ट रोजी भरले होते. मात्र त्यावेळी गळतीमुळे ग्राऊटिंगच्या कामासाठी या धरणाचे पाणी ऐन दिवाळीच्या आसपास सोडून द्यावे लागले होते. पाटबंधारे विभागाच्या दाव्यानुसार , गेल्या दोन वर्षांपासून या धरणाची गळती ९५ टक्के थांबली आहे. या हंगामात धरण परिसरात आज सकाळी झालेल्या नोंदीनुसार आजपर्यंत एकूण २८३९ मीमी मिमी इतका पाऊस झाला आहे.

हेही वाचा: Pune : वीर धरणातून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाणी सोडणार

२०१३ या वर्षात २५७५ मिमि इतका पाऊस होताच ३ ऑगस्ट रोजी हे धरण शंभर टक्के भरले होते. सन २०१४ मध्ये या धरण परिसरात २८०७ मिमि पाऊस होताच हे धरण ५ सप्टेंबर रोजी पूर्ण भरले होते. त्यानंतर गळतीचे प्रमाण मोठे असल्याने २०१४ ते २०१८ या कालावधीत या धरणाच्या ग्राउटिंगच्या कामासाठी सलग चार वर्षे पूर्ण क्षमतेने भरू शकले नाही. त्यामुळे दोन वर्षांपासून सुमारे ९५ टक्के गळती थांबल्यामुळे या धरणात पाणीसाठा पूर्ण क्षमतेने साठवू लागला आहे. यावर्षी पानशेत व वरसगाव ही धरणे टेमघर धरणाच्या तुलनेने लवकर भरली. मात्र टेमघर धरण भरायला यावर्षी सप्टेंबरचा निम्मा महिना उजडावा लागला आहे. तरीही गेल्यावर्षीच्या तुलनेने यावर्षी हे धरण तब्बल दीड महिना अगोदरच पूर्ण क्षमतेने भरले आहे.

पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार , या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १०७.९६ दशलक्ष घनमीटर(३.८१२ टीएमसी) आहे. उपयुक्त साठ्याची क्षमता १०५.०१ दलघमी (३.७१ टीएमसी) आहे. सन २०१० मध्ये दहा मीटरने या धरणाची उंची वाढविण्यात आल्याने पाण्याची साठवण क्षमताही दीड टीएमसीने वाढली आहे. टेमघर प्रकल्प उपविभाग क्रमांक २ चे उपअभियंता एच.जी. जाधव म्हणाले , " अद्यापही या धरणाची उर्वरित ५ टक्के गळती थांबण्यासाठी यावर्षीही ग्राउटिंगचे काम हाती घ्यावे लागणार आहे. त्यासाठी शासनाची मान्यताही मिळवावी लागणार आहे. "

दरम्यान हे धरण भरले तरी धरणग्रस्तांच्या समस्या मात्र तशाच प्रलंबित आहेत. त्यामुळे शासनाने धरणग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करावे तसेच अन्य़ समस्या सोडवाव्यात , अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची वाट पाहू नये , असाही इशारा वेगरे ग्रामपंचायतीचे सरपंच मिंनाथ कानगुडे तसेच धरणग्रस्तांनी दिला आहे.

loading image
go to top