

Pune's Minimum Temperature Drops Sharply
Sakal
पुणे : आर्द्रतेचे कमी झालेले प्रमाण, निरभ्र आकाश आणि उत्तरेकडून सातत्याने येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वाढलेला प्रभाव यामुळे पुणे शहरातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. परिणामी शहरात अनेक ठिकाणी किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदविले गेले आहे. लोणी काळभोर (हवेली) येथे ६.९ अंश सेल्सिअस अशा नीचांकी तापमानाची नोंद झाली, तर पुण्यात शिवाजीनगर येथे ९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, गेल्या तीन वर्षांतील सर्वांत नीचांकी तापमान मंगळवारी नोंदविले गेले. पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून कमी होणाऱ्या किमान तापमानामुळे पुणेकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे.