
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विज्ञान शिक्षण आणि संप्रेषण केंद्रात (सायन्स पार्क) विज्ञान दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Pune News : विज्ञान तर्काने नाही तर प्रयोगाने तपासा - विवेक सावंत
पुणे - एखाद्या गोष्टीवर ऐकीव माहितीच्या आधारे तर्कवितर्क लावण्या आधी ती गोष्ट खरोखरच घडली आहे का. हे तपासून घ्या, असा मोलाचा सल्ला महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादितचे संचालक विवेक सावंत यांनी उपस्थितांना दिला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विज्ञान शिक्षण आणि संप्रेषण केंद्रात (सायन्स पार्क) विज्ञान दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सावंत बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, प्रतिष्ठित प्राध्यापक व सायन्स पार्कचे माजी संचालक डॉ.दिलीप कान्हेरे, सायन्स पार्कचे समन्वयक डॉ. राजेंद्र देवपुरकर आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी ‘मानवी रक्ताभिसरण संस्था प्रोजेक्शन मॅपिंग शो’चे औपचारिक अनावरण करण्यात आले त्यासोबत विद्यार्थ्यांसाठी आयोजित वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले आणि विज्ञान पत्रिकेचेही विमोचन करण्यात आले.

सावंत म्हणाले, ‘समाजमाध्यमांवरील संदेश खरा की खोटा याची सत्यता स्वतः पडताळून न पाहता आपण पुढे पाठवतो. विज्ञान मात्र केवळ तर्कावर आधारलेले नसते, ते सत्यता पडताळून पाहणारे असते. आपणही एखादी गोष्ट सत्य आहे का हे तपासून पाहावे, त्याची निरीक्षणे घ्यावी. चांगला वैज्ञानिक हा निर्भय आणि नम्रता असणारा असतो.’
डॉ. सोनवणे म्हणाले, ‘प्रयोगशाळेतील शास्त्र हे जगापर्यंत पोहोचवणे हे खूप मोठे आव्हान आहे. त्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे म्हणूनच विज्ञान पत्रिका सुरू करण्याचं निर्णय घेण्यात आला आहे.’