Pune : दि पूना मर्चंटस् चेंबरच्या निवडणुकीचा बुधवारी फैसला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : दि पूना मर्चंटस् चेंबरच्या निवडणुकीचा बुधवारी फैसला

Pune : दि पूना मर्चंटस् चेंबरच्या निवडणुकीचा बुधवारी फैसला

sakal_logo
By
प्रविण डोके

पुणे (मार्केट यार्ड) : दि पूना मर्चंटस् चेंबरची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना निर्वाचन अधिकारी यांनी अचानकपणे मेलद्वारे राजीनामा दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रियाच थांबली आहे. चेंबरची कार्यकारणी बैठक बुधवारी सायंकाळी ५:०० वाजता होणार आहे. यामध्ये निर्वाचन अधिकारी नेमणूक, निवडणूक प्रक्रिया आणि मतदान कधी होणार हे ठरणार आहे. त्यामुळे थांबलेल्या चेंबरच्या निवडणुकी कधी होणार हे उद्या कळणार आहे.

दि पूना मर्चंटस् चेंबरची २०२१-२३ च्या कार्यकारिणी मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरु झालेली आहे . यामध्ये निवडणूकीसाठी ॲड. महादेव नवले यांची नेमणूक कार्यकारीणीच्या संमतीने करण्यात आली होती. त्यांच्या अधिकारात निवडणूक प्रक्रीयेचे कामकाज चालू होते. शुक्रवारी (ता. १९) उमेदवारांच्या अर्जाची छाननी चालू असताना काही तांत्रीक मुद्दयांवरुन तर काही इतर कारणाने १० उमेदवारांचे अर्ज मंजूरीविना राहीले होते. त्यापैकी उमेदवारांचे म्हणणे ऐकून अर्जावर निर्णय देण्यासाठी निर्वाचन अधिकाऱ्यांनी २४ तासांची मुदत घेतली होती. त्याप्रमाणे शनिवारी (ता. २०) संध्याकाळी सहा वाजता निर्णय घेतला जाणार होता. परंतु निर्वाचन अधिकारी यांनी रात्री ८:३० वाजेपर्यंत वेळ वाढवून घेऊन त्यावेळी निर्णय घेऊ असे सांगितले होते. परंतु यावर कोणताही निर्णय न घेता निर्वाचन अधिकारी यांनी निवडणुकीची प्रक्रिया अर्धवट सोडून मेलद्वारे राजीनामा दिल्याने ही प्रक्रिया थांबली आहे.

त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी नवीन निर्वाचन अधिकाऱ्यांची नेमणूक करणे आवश्यक आहे. त्यासाठी कार्यकारिणीची संमती घेणे आवश्यक आहे. यासाठी कार्यकारणी बैठक बुधवारी सायंकाळी ५:०० वाजता होणार आहे. यामध्ये नवीन निर्वाचन अधिकारी नेमून त्यामधून मार्ग काढून लवकरात लवकर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतचे परिपत्रक चेंबरने सभासदांना दिले आहे. याबाबत चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल म्हणाले, “निवडणुकीला विनाकरण विलंब करणे अथवा टाळाटाळ करण्याचा कोणताही उद्देश नाही. यासंदर्भात चूकीचे संदेश देऊ नयेत अथवा कोणीही गैरसमज करुन घेऊ नये".

हेही वाचा: झी न्यूज आणि टाइम्स नाऊवर कारवाई; चुकीच्या आणि एकांगी वार्तांकनावर ठपका

दहा मंजूरीविना अर्जांवर असा होणार निर्णय

निवडणुकीच्या नियम क्रमांक बारा प्रमाणे निश्चित केलेल्या यादीबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार ( ऑब्जेक्शन ) असल्यास उमेदवाराने अगर त्याचे अधिकृत प्रतिनिधीने किंवा वकीलामार्फत निर्वाचन अधिकाऱ्याकडे त्याबाबत लेखी तक्रार २४ तासांचे आत अगर तो दिवस सुट्टीचा येत असल्यास त्यानंतर येणाऱ्या प्रथम दिवशी ऑफिस कार्यालयाचे वेळेत केली पाहिजे. अशा अर्जावर निर्वाचन अधिकारी व चेंबरचे अध्यक्ष उमेदवाराचे अगर त्याचे प्रतिनिधीचे म्हणणे ऐकून घेऊन जो निर्णय देतील तो अंतिम राहिल. तो निर्णय सर्व उमेदवारांवर व तक्रार करणाऱ्या उमेदवारांवर सुद्धा संपूर्णत : बंधनकारक राहिल व अशाप्रकारच्या निर्णयावर कुठल्याही कोर्टात दाद मागता येणार नसल्याचे नियमात म्हटले आहे.

loading image
go to top