esakal | अवघे तीन दिवस पुरतील एवढ्याच सिरिंज शिल्लक
sakal

बोलून बातमी शोधा

syringe

Pune : अवघ्या तीन दिवस पुरतील एवढ्याच सिरिंज शिल्लक

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : पुणेकरांनो तुम्हाला कोरोना प्रतिबंधक लस घ्यायची असेल तर याकडे लक्ष द्या. राज्यात सिरिंजचा तुटवडा निर्माण झाल्याने त्याचा फटका पुणे शहरालाही बसत आहे. शासनाकडून आज (शनिवारी) ४१ हजार सिरिंज पुरविण्यात आले आहेत. तर महापालिकेकडे ३० हजार सिरिंजचा साठा आहे. या ७१ हजार सिरिंजद्वारे शहरात केवळ तीन दिवसच लसीकरण करता येणे शक्य आहे.

पुणे महापालिकेकडे शनिवारी सुमारे ६० हजार कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस शिल्लक आहे. एवढ्या लस एकाच दिवशी शहरात वितरित करण्याची व नागरिकांना लस देण्याची क्षमता महापालिकेच्या २०० केंद्रांवर आहे. यापूर्वी शहरात ६० हजारापेक्षा जास्त नागरिकांचे एकाच दिवशी लसीकरणही करण्यात आलेले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सिरिंजचा तुटवडा निर्माण झाल्याने पूर्ण क्षमतेने लसीकरण केले जात नाही. तीन दिवसांपूर्वी सिरिंज अभावी लसीकरण मोहीम बंद करण्यात आली होती. त्यावरून वाद निर्माण झाल्याने महापालिकेने १ लाख सिरिंज थेट खरेदी करून लसीकरण सुरू केले आहे. गेले दोन दिवस त्याद्वारेच लसीकरण सुरू आहे.

आज शासनाकडून पुणे शहरासाठी नव्याने लस पुरवठा झालेला नसला तरी ४१ हजार सिरिंज पुरविण्यात आल्या आहेत. महापालिकेने खरेदी केलेल्या १ लाख सिरिंजपैकी सुमारे ३० हजार सिरिंज शिल्लक आहेत. वर्तमान स्थितीत महापालिकेकडे सुमारे ७१ हजार सिरिंज आहेत. त्यात काही खराब निघतात, याचा विचार करून पुढील तीन दिवस लसीकरण करणे शक्य होणार आहे. महापालिकेने देखील त्याच दृष्टीने लसीकरणाचे नियोजन केले आहे. या काळात सिरिंजचा पुरवठा वाढल्यास लसीकरणाचे प्रमाण वाढवले जाईल, सध्या सिरिंज पुरवून वापरण्यावर भर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सोमवारी २१ हजार डोस

उद्या (रविवारी) शहरातील लसीकरण बंद असणार आहे. सोमवारी (ता.४) १८७ ठिकाणी कोव्हीशील्डचे प्रत्येकी १०० डोस तर ११ ठिकाणी कोव्हॅक्सीनचे प्रत्येकी २०० डोस असे २० हजार ९०० उपलब्ध असणार आहेत. यापैकी २० टक्के लस पहिल्या डोससाठी तर ८० टक्के डोस दुसऱ्या डोससाठी उपलब्ध असणार आहे.

‘‘राज्य शासनाकडून सिरिंज पुरवठा केला जात आहे. पण काही अडचण निर्माण झाल्यास शहरासाठी सिरिंज कमी पडू नयेत यासाठी महापालिका आणखी सिरिंज खरेदी करेल. लसीकरणात खंड पडू दिला जाणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत. ’’

मुरलीधर मोहोळ, महापौर

loading image
go to top