डिजिटल व्यवहारांत पुणे अव्वल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

डिजिटल व्यवहार करण्यात पुणे, चेन्नई, राजधानी दिल्लीचा परिसर आणि जयपूर ही शहरे देशात आघाडीवर असून, त्यातही पुणे हे अव्वल क्रमांकावर आहे.

पुणे - डिजिटल व्यवहार करण्यात पुणे, चेन्नई, राजधानी दिल्लीचा परिसर आणि जयपूर ही शहरे देशात आघाडीवर असून, त्यातही पुणे हे अव्वल क्रमांकावर आहे.

देशातील आघाडीची पेमेंट सोल्युशन कंपनी असलेल्या ‘रेझरपे’ने ‘दी इरा ऑफ रायझिंग फिनटेक’ हा अहवाल नुकताच प्रकाशित केला. भारतात वेगाने वाढणाऱ्या ‘फिनटेक इकोसिस्टम’चा अभ्यास यात केला आहे. या इकोसिस्टमचा लघु व मध्यम उद्योगांवर (एसएमई) होणाऱ्या परिणामाचाही आढावा तसेच डिजिटल व्यवहारांच्या पद्धती, ऑनलाइन खर्च करण्याच्या लोकांच्या सवयी, ‘यूपीआय’चा प्रभाव याबाबत विश्‍लेषणही आहे.

सध्या मोठ्या व मध्यम शहरांमधील लघुउद्योगांमध्ये रोकडरहित व्यवहार करण्याचे प्रमाण ७५ टक्‍क्‍यांनी वाढले आहे. नोटाबंदीनंतर व युनिफाइड पेमेंट्‌स इंटरफेस (यूपीआय) यंत्रणा सादर झाल्यानंतर डिजिटल पेमेंटसाठीची मागणी दरवर्षी ७० टक्‍क्‍यांनी वाढते आहे, असे पाहणीत आढळून आल्याची माहिती ‘रेझरपे’चे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षिल माथूर यांनी दिली.

पुणेकरांची आघाडी
पुण्यात डिजिटल पेमेंटची व्यवस्था कशा पद्धतीने विकसित झाली, याबाबत माहिती देताना माथूर म्हणाले की, प्रवास (२२.८ टक्के), ई-कॉमर्स (७.९ टक्के) आणि डिजिटल लेंडिंग (७.९ टक्के) या तीन क्षेत्रांमध्ये पुण्यात सर्वाधिक डिजिटल पेमेंट होतात. यापैकी ‘डिजिटल लेंडिंग’ ही संकल्पना तुलनेने नवीन असून, येत्या पाच वर्षांत ती एक लाख कोटी डॉलर या स्तरापर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. २०१८ च्या उत्तरार्धात ‘यूपीआय २.०’ सादर करण्यात आल्यामुळे मोठ्या व्यवहारांचे प्रमाण वाढले. इतकेच नाही, तर शहरात ‘पीटूएम’ ही संकल्पनाही वाढली आहे.

डिजिटल  पेमेंट वाढणार
‘रेझरपे’च्या अंदाजानुसार, २०२० पर्यंत देशातील ४० टक्के डिजिटल पेमेंट व्यवहार हे मध्यम व छोट्या शहरांतील व्यावसायिक व ग्राहकांकडून होतील. तसेच, इंटरनेट वापरणारे निम्मे नागरिक डिजिटल पेमेंटद्वारे व्यवहार करतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या अहवालातील सर्व निष्कर्ष जानेवारी २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीतील ‘रेझरपे’च्या प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune top in Digital Transactions