
पुणे : अभिनव चौकातील कोंडी सुटता सुटेना
पुणे: सायंकाळी तुम्ही कार्यालयातून बाहेर पडला आहात, तुम्हाला लवकर घर गाठायचे आहे, त्यासाठी तुम्हाला विधी महाविद्यालय रस्ता किंवा म्हात्रे पुलावरून अभिनव चौकातून (नळस्टॉप) कोथरूडच्या दिशेने जायचे आहे, तर तुम्ही मोठ्या वाहतूक कोंडीत अडकलात, असंच समजा. कारण, इथल्या कोंडीतून तुमची सुटका नाही, म्हणजे नाहीच होऊच शकत. तासाभरानंतर कुठे संथगती वाहतुकीतून तुम्ही पुढे जाऊ शकाल, असा अनुभव लाखो वाहनचालकांना दररोज येत आहे.
कर्वे रस्त्यावरील मेट्रो पूल बांधतानाच नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा, यासाठी मेट्रो पुलालगतच दुहेरी उड्डाणपूल बांधण्यात आला. या उड्डाणपुलामुळे डेक्कनहून पौड फाट्याकडे जाणाऱ्या व पौड फाट्याहून डेक्कनच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. दुसरीकडे, मात्र विधी महाविद्यालयाकडून येणाऱ्या वाहतुकीला थेट खीळ बसल्याची सद्यःस्थिती आहे. कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्य चौकापासून पुढे दुहेरी उड्डाणपूल सुरू होतो, हा पूल एसबीआय बॅंकेजवळ खाली उतरतो. त्यामुळे डेक्कनकडून जाणारी वाहने या पुलावरून पुढे जातात. परंतु, विधी महाविद्यालय रस्त्यावरून येणारी वाहने व म्हात्रे पुलावरून अभिनव चौकमार्गे येणारी वाहने मेट्रो पुलाखालून लागू बंधू दुकानासमोरील रस्त्यावरून पुढे जातात.
उड्डाणपुलामुळे अगोदरच निमुळत्या झालेल्या या रस्त्यावर दररोज सकाळी व सायंकाळी दोन्ही ठिकाणांहून मोठ्या संख्येने वाहने येतात. त्यावेळी पुलामुळे अरुंद झालेल्या रस्त्यावरून (बॉटलनेक) पुढे जाताना वाहनचालकांना कोंडीत अडकावे लागते. या अरुंद रस्त्यावर केवळ एक बस बसेल, इतकीच जागा उरते. त्यातही ‘पीएमपी’च्या पाच-सहा बस, एसटी किंवा खासगी बस एकामागोमाग आल्यानंतर तर विधी महाविद्यालय रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागतात. त्यातच शाळा, महाविद्यालये व अन्य सरकारी, खासगी कार्यालये सुटल्यानंतर या कोंडीमध्ये अधिक भर पडून कोंडी दशभुजा गणपती चौकापर्यंत जाते. पाडळे पॅलेस, महादेव मंदिराकडून येणाऱ्या दुचाकी व पाळंदे मार्गावरून येणाऱ्या चारचाकी वाहने मुख्य रस्त्यावर आल्यानंतर कोंडीत आणखीनच भर पडत आहे.
Web Title: Pune Traffic Abhinav Chowk
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..