Pune Traffic : श्रीराम चौकातील वाहतूककोंडीला चाकरमानी त्रासले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Traffic

Pune Traffic : श्रीराम चौकातील वाहतूककोंडीला चाकरमानी त्रासले

उंड्री : सय्यदनगर रेल्वे गेट क्र.7-हांडेवाडी रस्त्यावरील श्रीराम चौकातील वाहतूककोंडी नित्याची बाब झाली आहे. अवकाळी पावसामुळे उखडलेल्या रस्त्याचे डांबरीकरण आणि रुंदीकरणही अनेक वर्षांपासून रखडले आहे. पालिका प्रशासनाने आता अंत न पाहता रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी आर्जवी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी केली आहे.

सय्यदनगर रेल्वे गेट-हांडेवाडी रस्ता एकेरी केला असला तरी या रस्त्यावर विरुद्ध दिशेने येणारी वाहने, दुकानदारांचे पोटभाडेकरू, हातगाडीवाले आणि फेरीवाल्यांचे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत, तर पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांसह नोकरी-व्यवसायासाठी शहर-उपनगरामध्ये ये-जा करताना वाहनचालकांचा जीव मेटाकुटीस येत आहे. कर्णकर्कश हॉर्न, आणि वायू प्रदूषणामुळे स्थानिक नागरिक कमालीचे त्रासले आहेत. पालिका प्रशासन निष्पापांचा बळी जाण्याची वाट पाहातेय का, असा संतप्त सवाल रुपाली जाधव, वर्षा पाटील, वृषाली वाडकर, फय्याज खान, दिलीप निघोल यांनी नागरिकांच्या वतीने उपस्थित केला.

सय्यदनगर रेल्वे गेट आणि हडपसरहून काळेबोराटेनगर भुयारी मार्गातून हांडेवाडी, महंमदवाडी, उंड्रीकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. मात्र, अरुंद रस्ता आणि अतिक्रमणांमुळे श्रीराम चौकात सतत वाहतूककोंडी होत असल्याने स्थानिकांची कुचंबना होत आहे.

डॉ. अनिल पाटील, गंगा व्हिलेज सोसायटी

दरम्यान, महापालिका सहायक आयुक्त प्रसाद काटकर म्हणाले की, स्थायी समितीने सय्यदनगर-हांडेवाडी चौक दरम्यानच्या रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली आहे. या रस्त्याचे काम मार्च 2023 पर्यंत पूर्ण होणार असून, त्यासाठी टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती मुख्य खात्याकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले.