esakal | Pune : पिंपळे सौदागरमध्ये वाहतुकीचा बट्ट्याबोळ
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : पिंपळे सौदागरमध्ये वाहतुकीचा बट्ट्याबोळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपळे सौदागर : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी विकास प्रकल्पांतर्गत पिंपळे सौदागर येथील रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे पीके चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. हिंजवडी आयटी हबशी महत्त्वाची कनेक्टिव्हिटी असलेल्या या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. या चौकातील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. त्यामुळे या परिसरात राहणारे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या चौकात सायंकाळी वाहतूक पोलिस नसल्याने अनेक वेळा या परिसरातील नागरिकांनाच  वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. 

स्मार्ट सिटी विकास प्रकल्पांत पिंपळे सौदागरचा समावेश आहे. त्याअंतर्गत परिसरातील सर्वच रस्त्यावर कॉक्रीटिकरण करणे, फुटपाथ, जॉगिंग ट्रॅक आदी कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. पीके चौकात गेली तीन महिने रस्त्याचे काम सुरू आहे. या कामाला प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. ऐन चौकात रस्ता निमुळता झाल्यामुळे वाहनांना दाटीवाटीने पुढे मार्गस्थ व्हावे लागत आहे. भोसरी ते हिंजवडी आणि हिंजवडी ते भोसरीला जोडला जाणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. रस्त्याचे काम अर्धवट असल्याने चौकात वाहतुकीचे तीन तेरा वाजल्याचे पाहायला मिळत आहेत. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मंगळवारी पीके चौकात वाहतूक पोलिस नसल्यामुळे कित्येक तास वाहतूक पूर्ववत होण्यास वेळ लागला. पुढे कोकणे चौक आणि मागे गोविंद चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.

हेही वाचा: मिबा ड्राइव्हटेक कंपनीकडून साकोरे कुटुंबाला १३ लाखांची मदत

सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत संपूर्ण पिंपळे सौदागर परिसरात विकास कामे सुरू आहेत. हे करत असताना रस्त्या पूर्ण खोडून जमिनीखाली पिण्याच्या पाण्याची लाइन, सांडपाणी वाहिनी, पावसाच्या पाण्याची लाइन यासह अनेक कामे करावी लागत आहेत. म्हणून कामाला वेळ लागत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने कामात अडथळा येत आहे. काम करत असताना कोणत्याही रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक करण्यात आली आहे. काही रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे. जे कामे उर्वरित आहत ते थोड्याच दिवसात पूर्ण होतील. विकासकामे करताना नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेत आहोत. 

- मनोज शेठीया,

कार्यकारी अभियंता ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय

मागील काही महिन्यांपासून पिंपळे सौदागर परिसरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र रस्त्यांची कामे करत असताना वाहतुकीचे कोणतेही नियोजन नाही. त्यामुळे अनेक रस्त्यावर रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा कामावर जाण्यासाठी उशीर होत आहे. पावसाचे दिवस असल्याने रहाटणी चौक, पी. के. चौक यासह अनेक रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याची खोदाई केल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून दुर्गंधी येत आहे. मात्र, या परिसरातील वाहतूक कोंडी सुरळीत करणे अत्यंत गरजेचे आहे.

- हर्षद परमार, नागरिक

loading image
go to top