Pune News: वाहनचालकांनो तिळगुळ घ्या, गोड बोला अन् नियम पाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune News

Pune News: वाहनचालकांनो तिळगुळ घ्या, गोड बोला अन् नियम पाळा

उंड्री : तिळगुळ घ्या गोड बोला अन्, नियम पाळा आणि कारवाई टाळा. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर स्कूलबसचालकांसह अवजड वाहनचालकांनीही तिळगूळ घेत नियम पाळण्याचे आश्वासन दिल्याचे हांडेवाडी वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी साळुंखे यांनी सांगितले.

कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर हांडेवाडी चौकामध्ये वाहनचालकांना तिळगुळ घ्या, नियम पाळा, कारवाई टाळा असा प्रबोधनात्मक उपक्रम हांडेवाडी वाहतूक विभागाच्या वतीने राबविण्यात आला.

याप्रसंगी पोलीस हवालदार शशिकांत साळुंखे, गणेश कामठे,अतुल शिरसट,वैभव भोसले, संदीपकुमार गोवेकर,आप्पाराव कोळी आणि नागरिक उपस्थित होते.

एपीआय साळुंखे म्हणाले की, कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांसह स्कूलबस, पीएमपी बस, रिक्षा, दुचाकी आणि इतर वाहनांची सतत वर्दळ असते.

बाह्यवळण मार्गावर विद्युत खांबाच्या अडथळ्यामुळे रस्तारुंदीकरण रखडले आहे, गॅस वाहिनीचे चेंबर अनेक टिकाणी तुटले आहेत, त्याच्या दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुरू आहे.

वाहनचालकांमध्ये नियमांविषयी जनजागृती केली जात आहे, त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता परिक्षांचा कालावधी सुरू झाला आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अडचण होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे.

तिळगूळ घ्या, गोड बोला याबरोबर नियम पाळा हा उपक्रम अतिशय चांगला आहे. रस्त्यावर वाहन चालविताना आपलीही जबाबदारी महत्त्वाची आहे. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, यासाठी स्वतः नियमांचे बंधन घालून घेतले पाहिजे.

सागर अवताडे, रिक्षाचालक

बाह्यवळण मार्गावर वाहनांची खच्चून गर्दी असते. वाहनचालकांनी नियम पाळले, तर पोलीस कारवाई कशाला करतील, कुठेही अडथळा होणार नाही. अनेकवेळा आम्ही स्वतः चौकात थांबून वाहतूक सुरळीत कऱण्यासाठी मदत करतो.

पप्पू महापुरे, रिक्षाचालक

अरुंद आणि खड्डेमय रस्त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. प्रशासनाने रस्तारुंदीकरण आणि खड्डेमुक्त रस्ते केले, तर वाहतूककोंडी होणार नाही. मात्र, पालिकेच्या रस्ते विभागाकडून गांभीर्याने घेतले जात नाही, हे नागरिकांचे दुर्दैव आहे.

खंडेराव जगताप, हांडेवाडी चौक