esakal | Pune: थांबा, पुणे कोंडीत अडकलेय!
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic

थांबा, पुणे कोंडीत अडकलेय!

sakal_logo
By
संभाजी पाटील -@psambhajisakal

शहर एका बाजूला आणि धोरणे भलतीकडेच, अशीच सध्या पुण्याची अवस्था झाली आहे! शैक्षणिक-सांस्कृतिक राजधानी, आयटी हब, उद्योगाचे सर्वात मोठे जाळे आणि आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील प्रथम क्रमांकाचे शहर असणाऱ्या पुण्यात प्रवेश करतानाच धडकी भरावी अशी स्थिती आहे. मुंबईपाठोपाठ वेगवान असणाऱ्या पुण्याचे विमानतळ तब्बल १४ दिवस बंद राहणार आहे, तर दुसरीकडे रस्त्याने पुण्यात येताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक ओलांडण्यासाठी एक-एक तासाच्या वाहतूक कोंडीला दररोज सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीतून एक निष्कर्ष निघतो, तो म्हणजे शहराचा वेग आणि धोरणकर्ते, प्रशासन यांच्या कामाचा वेग, समज यांचा ‘स्पीड मॅच’ होत नाही.

पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वतंत्र विमानतळ हवे यावर गेली पंचवीस वर्षांपासून चर्चा सुरू आहे. एवढ्या मोठ्या कालावधीत आपण शहराचे-जिल्ह्याचे किती नुकसान केले, याचा नुसता अंदाज बांधा. बरं पुणे आणि जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी राज्यात आणि दिल्लीतही अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत, पण हा महत्त्वाचा विषय त्यांना आवश्यक त्या वेगाने पुढे रेटता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. एका बाजूला शहर वाढले, आयटी, ऑटोमोबाईल क्षेत्राचा विस्तार झाला या वाढीला आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करता आल्या नाहीत. त्यामुळेच १४ दिवस विमानतळ बंद राहणार या बातमीने खळबळ उडाली.

हेही वाचा: धुळे : 'तो' मृत्यूदेह विधवा तरूणीचा, प्रेम संबंधातून खून

वाहतूक कोंडीत अडकलेले मनुष्यबळ वाया जाऊ नये यासाठी जगभर नवनवे प्रयोग सुरू आहेत. दळणवळणाचे अत्याधुनिक पर्याय कमीत कमी कालावधीत पूर्ण करण्यावर भर दिला जात असताना विमानतळासाठी जागा निश्चित करण्यासाठी आम्ही दहा-बारा वर्ष घालवत असू, तर विकासाची आंतरराष्ट्रीय परिमाण गाठणे अशक्य आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदरमधील सात गावांतील जमिनी ताब्यात घेऊन प्रकल्प उभारण्यास केंद्र-राज्य सरकारसह संरक्षण विभागाची परवानगी मिळाली असताना आता पुरंदरमधील पाच आणि बारामती तालुक्यातील तीन गावांचा समावेश करून नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे विमानतळाची जागा अद्यापही निश्चित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भूसंपादन करणे, जागा ताब्यात घेणे, प्रकल्प उभा राहणे, त्यासाठीचा निधी उपलब्ध करणे या गोष्टी अद्यापही हवेतच आहेत. थोडक्यात एवढे दिग्गज नेते असताना एक विमानतळ आपण करू शकत नाही, या मर्यादा नेत्यांनी मान्य करायला हव्यात. याचा फटका औद्योगिक, आयटी, शेती अशा क्षेत्रांच्या वाढीला बसला आहे. नव्या विमानतळाची ही अवस्था असल्याने सध्याच्या लोहगाव विमानतळाचा विस्तार वेळेत होईल, यावर लक्ष द्यायला हवे.

हेही वाचा: मंचर : जादू दाखवितो सांगून मोबाईलच पळविला

एका बाजूला विमानतळाची ही अवस्था असताना मेट्रो वगळता शहरातील इतर प्रकल्पांची स्थिती फारशी चांगली आहे असे नाही. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडून एक वर्ष झाले, मात्र या ठिकाणी कोणतीही पर्यायी व्यवस्था तयार करण्यात आली नाही. विद्यापीठात नियोजित करण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे काम कधी सुरू होणार हे अद्यापही स्पष्ट नाही. पीएमआरडीएकडून या कामाची सुरुवात होण्यासाठी आणखी दोन वर्षे लागतील, असे सांगण्यात येत आहे.

सध्याच्या कामांचा वेग पाहता ही दोन वर्षे कधी उजाडणार याचा नियम नाही आणि हे काम सुरू झाल्यानंतर ते केव्हा पूर्ण होईल हेही सांगणे कठीण आहे. एकूणच या ठिकाणची परिस्थिती गंभीर असून, नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. येत्या दोन अडीच महिन्यांत महापालिका निवडणूक लागेल, त्यात सर्व राजकीय पक्ष ‘पुण्यातील वाहतुकीची कोंडी सोडवू’ असे आश्वासन जाहीरनाम्यात देतील. पण रस्त्यावरील कोंडी मात्र कायम असेल. हे चित्र बदलावे लागेल, काम करण्याची धमक असणारे लोकप्रतिनिधी निवडणे आणि व्हीजन असणारे अधिकारी आणणे यासाठी प्रयत्न करावे लागतील. अन्यथा पुन्हा तीच कोंडी, तीच चर्चा यात पुणे अनेक बाबतीत मागे पडलेले असेल.

हे तातडीने करण्याची गरज...

  • आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढील पाच वर्षांत पूर्ण करावा.

  • शहराचा एकात्मिक वाहतूक आराखडा करून कामांचे नियोजन करावे.

  • विद्यापीठ चौकातील कोंडी सोडविण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात.

  • पीएमआरडीए मेट्रो प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करावी.

loading image
go to top