esakal | अधिकाऱ्यासह दोघेजण 8 हजाराची लाच घेताना 'एसीबी'च्या जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

crime

अधिकाऱ्यासह दोघेजण 8 हजाराची लाच घेताना 'एसीबी'च्या जाळ्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : नवीन सदनिकांमध्ये वीजजोड बसविण्यासाठी खासगी व्यक्तीमार्फत 8 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरण विभागाच्या एका अधिकाऱ्यासह खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. त्यांच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संदिप दशरथ भोसले (वय 38) व खासगी व्यक्ती हरि लिंबराज सुर्यवंशी (वय 22, रा. लोहगाव) असे अटक केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 50 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. "एसीबी'ने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी नवीन सदनिकांचे बांधकाम केलेले आहे. त्यांच्या तीन सदनिकांसाठी नवीन वीज मीटर जोडणी करायची होती, तर एक मीटर स्थलांतरीत करायचा होता. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विश्रांतवाडी शाखेतील प्रधान तंत्रज्ञ संदिप भोसले यांच्याकडे अर्ज केला होता. दरम्यान, भोसले याने संबंधित कामासाठी 8 हजार रुपयांची लाच मागितली होती.

हेही वाचा: यंदा जिल्ह्यातील 1800 होमगार्ड गणेशोत्सवावर बहिष्कार टाकणार?

तक्रारदारास लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याप्रकरणी "एसीबी'कडे तक्रार केली होती. "एसीबी'च्या अधिकाऱ्यांनी या तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर भोसले व खासगी व्यक्ती सुर्यवंशी शुक्रवारी लाचेची रक्कम घेण्यासाठी येरवडा परिसरामध्ये आले होते. त्यांनी तक्रारदाराकडून आठ हजार रुपयांची लाच स्विकारली. त्यावेळी "एसीबी'च्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना येरवडा पोलिस ठाण्यात नेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. "एसीबी'चे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरीक्त पोलिस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रकांत चौधरी यांच्या पथकाकडून हि कारवाई करण्यात आली.

loading image
go to top