Pune : उजनी जल विद्युत केंद्रातून यंदा ३ कोटी यूनिट वीज निर्मिताचा विक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

Pune : उजनी जल विद्युत केंद्रातून यंदा ३ कोटी यूनिट वीज निर्मिताचा विक्रम

पळसदेव : पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरण यंदा दिर्घकाळ ओव्हरफ्लो राहिल्याने येथील जल विद्युत केंद्रातून रेकाॅर्ड ब्रेक वीज निर्मिती झाली आहे. राज्य विद्युत नियामक आयोगाकडून या विद्युत निर्मिती केंद्राला यंदा १.५५ कोटी युनिट वीज निर्मितीचे उद्दीष्ठ दिलेले असताना, प्रत्यक्षात मात्र उद्दीष्ठाच्या दुप्पट म्हणजे सुमारे ३ कोटी युनिट वीज निर्मिती करण्याचा विक्रम या केंद्राने केला आहे.

काल विद्युत केंद्राला विज निर्मितीसाठी देण्यात येणारे पाणी बंद करण्यात आल्याने, वीज निर्मिती केंद्राची चाके थांबली आहेत. मात्र यंदा पावसाचा मुक्काम वाढल्याने धरण दोन वेळा भरेल इतके पाणी धरणातून नदीत सोडण्यात आल्याने विजनिर्मितीचे सगळे रेकाॅर्ड मोडीत निघाले आहेत. उजनी धरण व्यवस्थापन (जलसंपदा) विभाग व महानिर्मिती कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांगडीतून वीज निर्मितीचा मोठा टप्पा गाठता आल्याचे बोलले जात आहे.

उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर यातून भीमा नदीत पाणी सोडले जाते. धरणाची क्षमता १२३ टीएमसी एवढी आहे. सध्या धरण १११ टक्के भरले आहे. यामुळे राज्यातील प्रमुख धरणांपैकी मोठ्या क्षमतेचे दुसऱ्या क्रमांकाचे धरण म्हणून याकडे पाहिले जाते. पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यात हरितक्रांती घडविण्यात या धरणाचा मोठा वाटा आहे. याशिवाय अनेक शहरे व गावांच्या पाणी योजना या धरणावर अवलंबून आहेत.

धरणातून नदीत जाणाऱ्या पाण्याच्या माध्यमातून वीज निर्मितीचा प्रकल्प येथे सन १९९४ मध्ये सुरू करण्यात आला. यासाठी धरणातून ओव्हरफ्लो होणारे पाणी व धरणाच्या पायथ्यालगत आणखी छोटा बांध घालून त्यातून पंपाच्या साह्याने पाणी उपसा करुन ते पुन्हा धरणात सोडून करण्यात येणारी विज निर्मिती अशा दोन पर्यायांमध्ये येथे वीज निर्मीती केली जाते. सन २०१२ पूर्वी राज्यात विजेचा तुटवटा असताना पंपाच्या माध्यामातून पाणी उपसा करुन विज निर्मिती केली जात होती.

यानंतर मात्र पंपाने वीज उपसा करणे बंद करण्यात आले आहे. केवळ धरणातून ओव्हरफ्लो होणारे पाणी वीज निर्मितीसाठी वापरले जात आहे. यामुळे २०१२ नंतर आजतागायत वर्षाकाठी ५० लाख ते १ कोटी युनिटपर्यंत वीज निर्मीती होत होती. यंदा मात्र परतीचा दमदार पाऊस झाल्याने धरणातून वीज निर्मितीला पाणी देणे शक्य झाले. ११ आॅगस्टला सुरु झालेली विज निर्मिती केंद्राची चाके अखंडीतपणे सुरू राहिली. यामुळे आतापर्यंत ३ कोटी युनिट वीज निर्मिती करणे शक्य झाले.

याबाबत उजनी जल विद्युत केंद्राचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मंजुनाथ बगाडे म्हणाले, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून उजनी जल विद्युत केंद्राला यावर्षी १.५५ कोटी यूनिट विज निर्मितीचे दिलेले उद्दीष्ठ महिनाभरात म्हणजे सप्टेंबरमध्ये पूर्ण झाले. यानंतरही उजनीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कायम राहिला. यामुळे धरण व्यवस्थापनाने आम्हाला वीज निर्मितीसाठी लागणारे पाणी दिले. यामुळे अखंडीत वीजनिर्मिती सुरु ठेवण्याचे आमचे प्रयत्न राहिले. यासाठी विज केंद्रातील तांत्रिक वर्ग व अधिकारी यांचे विशेष योगदान मिळाले.