
Pune : प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उंड्रीकरांचे जागरण गोंधळ
उंड्री : झोपी गेलेल्या पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी आज (गुरुवार, दि. २२ डिसेंबर, २०२२) उंड्री ग्रामस्थांनी जागरण गोंधळ घालून लक्ष वेधले. दुसऱ्या दिवशी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पालिकेमध्ये चर्चेचसाठी बोलाविले. मात्र, ग्रामस्थांनी इथेच चर्चा करा, असा पवित्रा उंड्रीगाव संघर्ष समितीने घेतला आहे. उंड्रीतील १२५ सोसायट्यांनी उपोषणाला पाठिंबा दिल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.
उंड्रीकरांनी पालिकेच्या जाचक अटींच्या निषेधार्थ हनुमान मंदिर चौकात आज गुरुवारी (दि. २२ डिसेंबर, २०२२) तिसऱ्या दिवशी उपोषण सुरू ठेवले आहे. प्रशासनाला सुबुद्धी देण्यासाठी यळकोट यळकोट जय मल्हार करीत जागरण गोंधळ घातला. जागरण-गोंधळाकडे बाह्यवळण मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांचेही लक्ष वेधले. मात्र, पालिका प्रशासनाला का जाग येत नाही, अशी विचारणा उपोषणकर्त्यांनी केली.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या दराने करआकारणी करावी. करआकारणीतून किमान, पाणी, रस्ते, वीज, आरोग्याच्या सुविधा द्याव्यात, अशी मागणी उपोषणकर्त्या ग्रामस्थांनी पालिका प्रशासनाकडे लावून धरली आहे. उंड्री ग्रामपंचायत कर कमी घेऊन सुविधा देत होती. मात्र, पालिका प्रशासन जास्तीचा कर घेऊन काहीही सुविधा देत नाही, असा आरोपही यावेळी उपोषणकर्त्यांनी केला.
बांधकामाचा प्रकार, ग्रामपंचायत, पालिका (आकडेवारी रुपयांत) गोदाम २.८० ----------५४
पत्रा शेड २.६० -----------३०
निवासासाठी ७० पैसे -----------६
निवासी आरसीसी २.५० -----------२१
गोदाम आरसीसी ३.५० ----------६६
साधे निवासी बांधकाम २ --------------१५
व्यावसायिक गोदाम २.५० ५४
हिवाळी अधिवेशनात गाजले उंड्रीकरांचे उपोषण
हिवाळी अधिवेशनामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी उंड्री ग्रामस्थांच्या करवाढी निषेधार्थ उपोषणाचा मुद्दा उपस्थित केला. तुपे म्हणाले की, शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात घर बांधले आहे, त्याला पालिका प्रशासनाने अवाजवी कर आकारला तो कमी करण्यासाठी त्यांना उपोषण करण्याची वेळ आली आहे, ही बाब दुर्दैवी आहे.