esakal | पुणे विद्यापीठ सुरू करणार काश्‍मीरमध्ये शिक्षण संकुल 
sakal

बोलून बातमी शोधा

puneuniversity

जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम रद्द झाल्यामुळे तेथे शैक्षणिक संकुल उभे करण्यासाठी पुण्यातील अनेक संस्था पुढे आल्या आहेत. यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठही मागे नाही. काश्‍मीरमध्ये शिक्षण संकुल सुरू करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. 

पुणे विद्यापीठ सुरू करणार काश्‍मीरमध्ये शिक्षण संकुल 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम रद्द झाल्यामुळे तेथे शैक्षणिक संकुल उभे करण्यासाठी पुण्यातील अनेक संस्था पुढे आल्या आहेत. यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठही मागे नाही. काश्‍मीरमध्ये शिक्षण संकुल सुरू करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. 

परिषदेच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक काश्‍मिरी विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात. विद्यापीठातही शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांना विद्यापीठाचे अभ्यासक्रम तेथेच उपलब्ध करून द्यावेत, असा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी हा प्रस्ताव मांडला. "सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, ""पुणे आणि काश्‍मिरी विद्यार्थी हे नाते आहेच. ते दृढ करण्यासाठी जम्मू-काश्‍मीरमध्ये विद्यापीठाचे कॅंपस सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.'' 

"महाराष्ट्राबाहेरच्या राज्यात अभ्यासक्रम सुरू करायचे असल्याने त्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागण्याबाबत प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाली, तर तेथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. यात स्थानिक गरजेनुसार विविध अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे. राज्य सरकारकडून परवानगी मिळण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करेल,'' असे पांडे यांनी सांगितले. 

कौशल्य अभ्यासक्रम सुरू करणार 
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, ""काश्‍मीरमध्ये पर्यटनाचा व्यवसाय मोठा आहे, तसेच सफरचंदाचे उत्पादन घेतले जाते. यासंदर्भात कौशल्य देणारे अभ्यासक्रम तेथे सुरू करता येतील. त्यासाठी विद्यापीठ स्वत: तेथे संकुल सुरू करेल किंवा स्थानिक चांगल्या शिक्षण संस्थेबरोबर विद्यापीठ शैक्षणिक उपक्रम राबवेल. दोन्ही पर्यायांचा विचार केला जाणार आहे.'' 
 

loading image
go to top