esakal | पुणे : सिरींजच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा हात आखडता
sakal

बोलून बातमी शोधा

 injection

सिरींजच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा हात आखडता

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील - सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी महापालिकेने इंजेक्शनची सुई (सिरींज) उपलब्ध केलेली असली तरी शासनाकडून आज देखील (शुक्रवारी) सिरिंजचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे महापालिकेकडे मुबलक लस असली तरी सिरिंजच्या तुटवड्यामुळे प्रत्येक केंद्रावर केवळ १०० डोस पुरविण्यात आले आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी महापालिकेला केंद्र सरकारकडून लस पुरवली जाते तर सिरींज या राज्य सरकारकडून दिल्या जातात. केंद्राकडून ज्या प्रमाणात लस उपलब्ध होते त्यानुसार सिरींज देखील मिळतात. मात्र, गेल्या आठवड्यापासून सिरींज मिळण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी सिरींज नसल्याने महापालिकेला लसीकरण बंद ठेवण्याची नामुष्की आली होती. यावरुन आरोपप्रत्यारोप सुरू झाल्याने राजकारण पेटले होते. त्यानंतर अखेर महापालिकेने स्वतःहून १ लाख सिरींज विकत घेऊन लसीकरण सुरू करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: राज्यात केव्हाही निवडणूक लागू शकते; आशिष शेलारांचे सूचक वक्तव्य ! ; पाहा व्हिडिओ

पुणे महापालिकेकडे सुमारे ८० हजार डोस उपलब्ध आहेत. एवढ्यामोठ्या प्रमाणात लस असून सुद्धा महापालिकेने प्रत्येक केंद्रावर १०० डोसच उपलब्ध करून दिले आहेत. शुक्रवारी १८९ लसीकरण केंद्रावर प्रत्येकी १०० या प्रमाणे १९ हजार ९०० डोस उपलब्ध करून देण्यात आले होते. आज दिवसभरात शासनाकडून सिरींज उपलब्ध झालेल्या नाहीत, त्यामुळे उद्याचे (शनिवार) लसीकरणाचे नियोजन करताना प्रत्येक केंद्रावर १०० डोसच उपलब्ध करून दिले आहेत. रविवारी लसीकरणास सुट्टी असल्याने तो पर्यंत शासनाकडून सिरींज उपलब्ध होईल, असे सूत्रांनी सांगितले.

२० टक्के सिरींज होतात खराब

लसीकरण केंद्रावर जेवढ्या लस पुरविल्या जातात, त्यापेक्षा जास्त सिरींज जास्त पुरवाव्या लागतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लसीकरणादरम्यान, सुमारे २० ते २५ टक्के सिरींज खराब निघतात, त्यामुळे त्यांचा उपयोग होत नाही. शासनाकडून सध्या मोठ्याप्रमाणात लस उपलब्ध होत आहे, त्यामुळे महापालिकेने १ लाख सिरींज खरेदी केल्या असल्या तरी त्या अपुऱ्या आहेत.

loading image
go to top