
पुणे : संविधान दिंडी तून जागृतीचे विविध उपक्रम
कॅन्टोन्मेंट : देहू-आळंदी-पंढरपूर वारीत 'संविधान दिंडी' या उपक्रमातून भारतीय संविधानाविषयी जागृती करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट(बार्टी)चा या उपक्रमात पुढाकार असून पुण्यातील 'होप स्टुडियो 'च्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तसेच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात ठिकठिकाणी 'संविधान जलसा' कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. संविधान व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे. या प्रती वारीत वितरित केल्या जातील. अभंग, कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून संविधानाची मूल्ये प्रसारित केली जातील. दृकश्राव्य माध्यमातून तसेच समाज माध्यमातून संवाद साधला जाणार आहे.
पुणे येथे २३ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ए.डी.कॅम्प चौक(नाना पेठ) येथे लोकशाहीर संभाजी भगत यांचा 'संविधान जलसा' हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ सिनेअभिनेते नासिरूद्दीन शाह, अभिनेत्री सुप्रिया पाठक हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे,राज्यमंत्री विश्वजित कदम,सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे,बार्टीचे महासंचालक धम्मदीप गजभिये,आमदार सुनील कांबळे,संजय नहार,निलेश नवलखा,डॉ अमोल देवळेकर तसेच राजकीय,सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. 'संविधान दिंडी'द्वारे भारतीय राज्यघटनेचे मूल्य रुजविण्यासाठी देहू-आळंदी ते पंढरपूर मार्गावर १५ दिवस सर्व पातळ्यांवर प्रचार,प्रसार करण्यात येणार आहे.संविधानाचा प्रसार करणाऱ्या समतादूतांचा सन्मान या कार्यक्रमात केला जाणार आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन 'होप स्टुडियो'चे संस्थापक डॉ अमोल देवळेकर,संचालक विकास सोनताटे यांनी केले आहे. 'भारतीय राज्य घटनेला अभिप्रेत खरा नागरिक घडविण्याची रुजवणूक संतांच्या शिकवणीत असल्याने वारीत संविधानाविषयी जागृती करणारे उपक्रम केले जात आहेत',असे डॉ.अमोल देवळेकर यांनी सांगितले.
दरम्यान २१ जून रोजी सायंकाळी ५ वाजता येरवडा येथे 'बार्टि' चे महासंचालक धम्मज्योती गजभिये, लोकशाहीर संभाजी भगत यांच्या उपस्थितित या संविधान दिंडीला उत्साहात प्रारंभ झाला.
Web Title: Pune Various Awareness Activities Through Constitution Dindi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..