Pune: व्हायरल व्हिडीओमुळे रस्त्यावरील आजीबाईंना मिळाला सहारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हायरल व्हिडीओमुळे रस्त्यावरील आजीबाईंना मिळाला सहारा

पौड : व्हायरल व्हिडीओमुळे रस्त्यावरील आजीबाईंना मिळाला सहारा

sakal_logo
By
बंडू दातीर

पौड : सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे पंधरा दिवसांपासून रस्त्यावर राहत असलेल्या आजीबाईंना एलआयसीचे विकास अधिकारी मारूती धोंडीबा सातपुते (रा.वळणे, ता.मुळशी) यांच्या धडपडीमुळे हेल्पिंग हॅंड संस्थेत हक्काचा सहारा मिळाला. मानवसेवा संस्थेचे लक्ष्मण चव्हाण यांनी व्हायरल केलेला व्हिडीओ आणि सातपुते यांची सामाजिक बांधिलकी म्हणजे जे के रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ।। याचाच प्रत्यय आणणारी ठरली.

कोथरूडच्या कचरा डेपोजवळील रस्त्यावरील बाकड्यावर सत्तरवर्षीय आजीबाई गेली पंधरा दिवसांपासून राहत होत्या. आजारपण आणि घरगुती कलहामुळे रागाने त्या घरातून निघून आल्या होत्या. मुलाने अनेकवेळा विनवनी करून त्या घरी जात नव्हत्या. मानवसेवा संस्थेचे प्रमुख लक्ष्मण चव्हाण यांनी आजीला पाहीले. त्यांनी आस्थेने चौकशी असता आजीबाईंनी त्यांचे नाव लिलाबाई बबन सातपुते (रा.वळणे, ता.मुळशी) सांगितले. आजीचे नातेवाईक मिळावेत यासाठी चव्हाण यांनी व्हिडीओ काढून तो सोशल मिडीयावर व्हायरल केला.

हेही वाचा: बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अद्याप अपूर्णच

मारूती सातपुते हे शिवाजीनगर शाखेत एलआयसीचे विकास अधिकारी आहेत. मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून ते काम करतात. प्रसिद्धीपराडमुख राहत त्यांची सामाजिक बांधिलकी अनेकांना माहिती आहे. त्यांनी हा व्हिडीओ पाहीला. ही आजी आपल्याच गावातील असल्याचे त्यांनी ओळखले. चिंतामण सातपुते (वळणे) यांना बरोबर घेवून ते घटनास्थळी गेले. पंधरा दिवस मिळेल ते खाऊन आजीबाई दिवस ढकलत होत्या. एकाच जागेवर असल्यामुळे दुर्गंधीही येत होती. त्यामुळे सातपुते यांनी आजींवर तातडीने वैद्यकिय उपचाराची व्यवस्था केली. कोंढव्यातील हेल्पिंग हॅंड सोशल फाऊंडेशनच्या प्रमुख स्वाती डिंबळे यांना बोलविले.

कोथरूड पोलिस ठाण्यात जावून त्यांनी आजीची रितसर तक्रार नोंदविली. पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनीही मानवतेच्या भूमिकेतून सर्वप्रकारची मदत केली. डिंबळे यांनी आजीबाईंना त्यांच्या संस्थेत नेले. त्याठिकाणी त्यांना न्हाऊ घातले. चव्हाण यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केलेला व्हिडीओ, पोलिसांची माणूसकी आणि सातपुते यांनी त्यावर तातडीने उचललेले पाऊल यामुळे आजीबाईंना हक्काचा आसरा मिळाला. विम्याच्या माध्यमातून अनेक कुटूंबाना आर्थिक संरक्षण देणाऱे मारूती सातपुते यांच्या मानवतावादी भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

loading image
go to top