विश्रांतवाडी परिसरातील कळस भागात बिबट्याचा वावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्या

विश्रांतवाडी परिसरातील कळस भागात बिबट्याचा वावर

विश्रांतवाडी : कळस परिसरातील आर अ‍ॅन्ड डी ईमध्ये पहाटे साडेचारच्या सुमारास लष्कर परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

विश्रांतवाडी-आळंदी मार्गावर लष्कर विभागाचा आरएनडीई (संशोधक विभाग)असून यालगतच लष्कराच्या जवानांसाठी सरावाचा व सोसायटीचा भाग आहे. त्यालगतच संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. हा नदीकाठचा भाग असून येथे मोठ्या प्रमाणात जंगलाचा भाग आहे. त्यामुळे परिसरात नेहमीच छोटे-मोठे वन्यप्राणी दिसत असतात. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास लष्कराचे जवान या भागात पहारा देत असतांना पथदिव्याच्या उजेडात बिबट्याचा वावर स्पष्टपणे दिसून आला. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे बिबट्या फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये निदर्शनास आले. याची व्हिडीओ क्लिप वायरल झाल्यामुळे परिसरातील लहान मुलासह महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागात लष्कराचे जवान सराव करत असतात आणि त्या भागातच बिबट्या दिसून आला असल्याने सुरक्षिततेचा प्रश्‍न समोर आला आहे.

बिबट्या पाहून लष्कराच्या जवानांनी आरडाओरडा करून हाकलण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो जंगलाच्या दिशेने गेला. तर लष्कराची संरक्षक भिंत असल्यामुळे त्यास भर लोकवस्तीत येता आले नाही. त्यामुळे अनर्थ टळला. एखादी दुर्घटना घडण्याअगोदर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

यासंदर्भात विनोद पवार म्हणाले की हा मार्ग श्री क्षेत्र आळंदीसह बोपखेल या भागाकडे जात असल्यामुळे रात्री-मध्यरात्रीच्या सुमारासही दुचाकीसह चारचाकी वाहनांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे प्रशासनाने परिसरात सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात. यासंदर्भात वनखात्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिसराची पाहणी करून शोध घेतला असता बिबट्या परिसरात दिसून आला नाही. त्यातच परिसरालगत नदीसह जंगल मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भक्ष्याच्या शोधार्थ नकळत वस्तीत बिबट्या आला असेल अशी चर्चा परिसरात रंगली आहे.

Web Title: Pune Vishrantwadi Leopards Roam Kalas

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..