पुणे विभागात टँकरची संख्या ‘शून्य’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Tanker

पुणे विभागातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या अद्यापही शून्यावर कायम आहे.

Water Tanker : पुणे विभागात टँकरची संख्या ‘शून्य’

पुणे - पुणे विभागातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या अद्यापही शून्यावर कायम आहे. यामुळे विभागातील पाणी टंचाईची स्थिती गतवर्षीच्या तुलनेत थोडी बरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी पाण्याअभावी भर पावसाळ्यात घशाला कोरड पडलेली गावे यंदा मात्र पिण्याच्या पाण्यामुळे तृप्त आहेत. यंदा चांगली आहे. गेल्या वर्षी भर पावसाळ्यात म्हणजेच जूनच्या अखेरीपर्यंत विभागातील ५४ गावे आणि ३४२ वाड्या-वस्त्या या पाण्यावाचून तहानलेल्या होत्‍या, असे विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या टॅंकरच्या संख्येच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

दरवर्षी साधारणतः डिसेंबर महिन्यापासूनच विभागातील काही गावे आणि वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असल्याचे टॅंकरची मागणी करणाऱ्या प्रस्तावांच्या संख्येवरून दिसून येत असे.

यंदा मात्र मार्च महिना संपत आला तरी, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करणारा एकही प्रस्ताव अद्यापही प्राप्त झालेला नसल्याचे विभागातून आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.

विभागातील तहानलेल्या गावांमधील १ लाख २३ हजार ४७६ लोकसंख्या पाण्याअभावी त्रस्त झाली होती. या लोकसंख्येला ७० टॅंकरद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. तहानलेल्या या सर्व गावांमध्ये पुणे, सांगली आणि सातारा या तीनच जिल्ह्यातील गावांचा समावेश होता. गतवर्षीच्या भर पावसाळ्यात विभागात सुरु असलेल्या एकूण टॅंकरपैकी सर्वाधिक ५४ टॅंकर हे पुणे जिल्ह्यात सुरु होते. पुणे जिल्ह्यातील ३६ गावे आणि २५३ वाड्यांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता.

पुणे विभागात पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर हे पाच जिल्हे येतात. या पाच जिल्ह्यांमधील काही तालुके हे दुष्काळी भागातील तालुके म्हणून ओळखले जातात. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, पुरंदर या तीन तालुक्यांसह सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, सांगली जिल्ह्यातील जत, तासगांव, मिरज, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा, माढा, करमाळा माळशिरस आदी तालुक्यांचा समावेश असल्याचे यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.

टॅग्स :puneWater supply