पुण्यात पावसाची प्रतीक्षा कायम

पुण्यात पावसाची प्रतीक्षा कायम
Published on

पुणे, ता. १९ : गेल्या काही दिवसांपासून पावसाचा अंदाज व्यक्त होत असला, तरी पुण्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. शहरात शनिवारी दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहिल्याने कमाल तापमानात किंचित वाढ झाली. पुढील दोन ते तीन दिवसांत शहरात मुसळधार पावसाची शक्यता नसून, तुरळक ठिकाणी हलक्या ते अतिहलक्या सरी पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे. मंगळवारनंतर (ता. २२) राज्यासह पुण्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवूनही पुण्यात पाऊस का पडला नाही, यावर स्पष्टीकरण देताना भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणेचे वैज्ञानिक ‘डी’ डॉ. एस. डी. सानप म्हणाले, ‘‘हवामान विभागाचा अंदाज हा केवळ पुण्यासाठी नसून संपूर्ण जिल्ह्यासाठी असतो. सध्या पडणारा पाऊस हा सर्वदूर नसून स्थानिक स्वरूपाचा आहे. शहरात पाऊस नसला तरी जिल्ह्याच्या काही भागांत हलक्या सरी कोसळल्या आहेत. पुढील दोन-तीन दिवस शहरात मुसळधार पावसाची शक्यता नाही.’’
दरम्यान, शहर आणि परिसरात शनिवारी (ता. १९) दिवसभर आकाश निरभ्र असल्याने उकाड्यात आणि तापमानात किंचित वाढ जाणवली. शहरात कमाल ३२ अंश, तर किमान २२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परिणामी, पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागला.
पुणे आणि परिसरात रविवारी (ता. २०) सकाळच्या सुमारास आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील. मात्र, दुपारी किंवा सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ होऊन शहर व परिसरात हलक्या ते अतिहलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान ३२ अंश, तर किमान २२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com