पुणेकरांना मिळणार उन्हाळ्यातही पुरेसे पाणी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 November 2019

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही भीमा खोऱ्यातील उजनीसह मोठी धरणे सध्या पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये सध्या 28.14 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत सुमारे पाच टीएमसीने अधिक आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यातही पुणेकरांना नियमित आणि पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे. 

पुणे : नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही भीमा खोऱ्यातील उजनीसह मोठी धरणे सध्या पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये सध्या 28.14 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत सुमारे पाच टीएमसीने अधिक आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यातही पुणेकरांना नियमित आणि पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे. 
खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो; तसेच बारामती, इंदापूर परिसरातील शेतीला आवर्तन दिले जाते. या प्रकल्पाची क्षमता 29.15 टीएमसी इतकी आहे. यंदा झालेल्या पावसामुळे नऊ नोव्हेंबरअखेर या प्रकल्पात क्षमतेच्या तुलनेत केवळ एक टीएमसी पाणी कमी आहे. मात्र, गतवर्षीपेक्षा पाच टीएमसी जादा पाणीसाठा आहे. या प्रकल्पात मागील वर्षी 23.18 टीएमसी पाणीसाठा होता. प्रकल्पातील पाणीसाठा संपत आल्यामुळे गेल्या उन्हाळ्यात पाणीकपातीचे संकट ओढवले होते. 
भीमा खोऱ्यातील वरसगाव, पानशेत, नीरा देवघर, भाटघर, वडज, डिंभे, घोड, विसापूर, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडिवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, गुंजवणी, वीर आणि नाझरे या धरणांमध्ये शंभर टक्‍के पाणीसाठा आहे; तर खडकवासला धरणात 96.87 टक्‍के, टेमघरमध्ये 74 टक्‍के, येडगाव 93 टक्‍के, पिंपळगाव जोगे 93 टक्‍के आणि माणिकडोह धरणात 89 टक्‍के पाणीसाठा उपलब्ध आहे. 

टॅंकरची संख्या शून्यावर 
पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पाण्याचे टॅंकर पूर्णपणे बंद आहेत. मागील उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे टॅंकरची संख्या वाढली होती. ही संख्या यंदा शून्यावर आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune will get enough water in the summer