esakal | पिडीत महिलेला मिळाला 'त्या चौघींचा' आधार; पण जगण्याचा प्रश्‍न कायम

बोलून बातमी शोधा

पिडीत महिलेला मिळाला 'त्या चौघींचा' आधार; पण जगण्याचा प्रश्‍न कायम
पिडीत महिलेला मिळाला 'त्या चौघींचा' आधार; पण जगण्याचा प्रश्‍न कायम
sakal_logo
By
पांडुरंग सरोदे @spandurangSakal

पुणे : लहान वयातच लग्न आणि त्या कोवळ्या वयातच संसाराचा गाडा हाकण्याची वेळ तिच्यावर आली. त्यातच मद्यपी नवऱ्याने चार मुली झाल्या म्हणून तिला अंगावरील कपड्यानिशी घराबाहेर काढले. इथून सुरू झाली जगण्याची नवी लढाई. एकीकडे कोरोनामुळे हातचे काम गेले, घरभाडे भरायलाही पैसे उरले नाहीत. लेकरांच्या पोटाला अन्न द्यायचे दूरच, पण आजारी मुलीला औषधेही मिळेनात, अशा परिस्थितीत त्या चौघीजणी तिच्या मदतीसाठी धावून आल्या. त्या चौघींनी किराणा, घरभाडे, घरखर्चासाठी थोडे पैसे देऊन तिला तात्पुरता आधार दिला, आता तिला गरज आहे, समाजाच्या मदतीची, खंबीर उभा राहण्यासाठी भक्कम पाठींब्याची !

अर्चना कांबळे असे त्या महिलेचे नाव आहे. तर ऍड.प्रार्थना सदावर्ते, ऍड.राणी कांबळे, पोलिस कर्मचारी ज्योती काचळे व प्रा. संगीत मावळे असे तिच्यात जगण्याची उमेद निर्माण करणाऱ्या त्या चौघाजणींची नावे आहेत. अल्पशिक्षीत अर्चना यांचे लहान वयातच लग्न झाले. मद्यपी नवऱ्यासमवेत मिळेत तिथे घरकाम करून त्यांचा संसार सुरू होता. त्यानंतर त्यांना चारही मुली झाल्या. आयुष्याचा दिवा लावण्यासाठी मुलगा नाही, म्हणून पतीने कांबळे यांना चार मुलींसमवेत मागील वर्षी घराबाहेर काढले. त्यानंतरही त्या हरल्या नाहीत. वृद्ध आईपासून काही अंतरावर खोली भाड्याने घेऊन राहू लागल्या. त्याचवेळी शहरात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. त्यामुळे कांबळे यांच्या हाताचे कामही गेले. लग्न झाल्यापासून सतत मार, शिव्या, उपासमारीने त्यांच्या देहाचा सापळा झालेला, तर दुसरीकडे हे सारं पाहून मलूल झालेल्या कोवळ्या लेकी, त्यातील एकीच्या आजारपणामुळे त्यांची जगण्याची लढाई सुरू झाली. पण पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने त्यांच्या धडपडीला आडकाठी आणली.

हेही वाचा: Good News:हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजार ३८२ जणांचे कोरोना लसीकरण

दरम्यान, त्यांना भेटलेल्या ऍड. राणी कांबळे यांनी त्यांना एकही पैसा न घेता कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. ही खबर पुणे पोलिसांच्या भरोसा सेलमधील महिला सहायता कक्षाच्या समुपदेशक ऍड.प्रार्थना सदावर्ते यांच्यापर्यंत पोचली. त्यांनी कांबळे यांची प्रत्यक्ष परिस्थिती पाहील्यानंतर त्यांचेही मन हेलावले. त्यानंतर सदावर्ते, ऍड.कांबळे, पोलिस कर्मचारी काचळे व प्रा. मावळे यांनी पदरमोड करून व समाजाच्या मदतीने कांबळे यांना तात्पुरते घरभाडे, वीजबील, घरखर्चासाठी पैसे दिले. त्यांना एक महिन्याचा किराणा भरून दिला. या मदतीने कांबळे व त्यांच्या मुलींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

आता त्यांना गरज आहे, समाजाच्या मुक्तहस्ते मदतीची !

"त्या' चौघींनी केलेली मदत आधार देणारी नक्कीच आहे, पण कायम पुरणारी नाही. कांबळे यांच्या चारही मुलींना चांगले शिकायचे आहे. त्यांच्या शिक्षणासाठी, संसार चालविण्यासाठी, आजारी मुलीच्या औषधोपचारासाठी आणि त्यांच्या हाताला कामाची नितांत गरज आहे. किमान कोरोनाचे संकट दूर होईपर्यंत, पुढची काही वर्ष तरी त्यांच्या त्यांना समाजाच्या मुक्तहस्ते मदतीची गरज आहे.

"मुली झाल्यामुळे पती मारहाण करीत होता. चौथ्या मुलीचे पतीने तोंडही बघितले नाही. जाचाला कंटाळून मी दुसरीकडे राहायला लागले आहे. कोरोनामुळे माझे धुणीभांड्यांची कामेही गेली, आता हाताला काम नाही. ऍड.सदावर्ते, ऍड.कांबळे, प्रा.मावळे व काचळे यांच्या मदतीमुळे मला थोडा आधार मिळाला आहे. लेकरांचे पोट कसे भरायचे, मुलींना कसे शिकवायचे आणि जगायचे कसे, आता कळत नाही.'' - अर्चना कांबळे.

अर्चना कांबळे यांना मदत करण्यासाठी ऍड.प्रार्थना सदावर्ते यांच्याशी साधा संपर्क - 8552064000