Pune News : “सर्वास” इंटरनॅशनलची जागतिक परिषद यंदा पाचगणीत होणार.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune News : “सर्वास” इंटरनॅशनलची जागतिक परिषद यंदा पाचगणीत होणार....

बारामती : जागतिक शांतता व सौहार्द यासाठी गेल्या 73 वर्षांपासून कार्यरत असलेले जागतिक संघटन “सर्वास” इंटरनॅशनलची जागतिक परिषद पाचगणी येथे 22 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. सर्वास इंडियाचे राष्ट्रीय सचिव बारामतीकर असलेल्या अभय शहा यांनी या बाबत माहिती दिली. या परिषदेचे उदघाटन राजमोहन गांधी यांचे हस्ते 22 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

शंभरहून अधिक देशात “सर्वास” च्या शाखा असून प्रत्येक तीन वर्षानंतर जागतिक परिषद आयोजिली जाते. 2015 मध्ये न्यूझीलंड तर 2018 मध्ये दक्षिण कोरिया येथे परिषदा पार पडल्या.सुमारे चाळीस वर्षानंतर भारताला जागतिक परिषद आयोजित संधी प्राप्त होत आहे. 22 ते 28 नोव्हेंबर दरम्यान पाचगणीतील एम. आर. ए. Initiatives of change या संस्थेमध्ये या परिषदेचे आयोजन केले आहे. यामध्ये जगभरातून 43 देशातील 139 प्रतिनिधी सहभागी होत आहेत.

“सर्वास” इंडियाचे अभय शहा (बारामती) हे गेले तीन वर्षांपासून हिरेन गोराडिया (मुंबई) यांचे मदतीने ही परिषद भारतामध्ये व्हावी यासाठी प्रयत्नशील होते, त्याला यश आले आहे. तीन वर्षातून एकदा होणाऱ्या या 32 व्या अधिवेशनाची संधी 42 वर्षानंतर प्रथमच भारताला मिळाली आहे. या परिषदेला जागतिक पदाधिकारी अध्यक्ष स्वीडनचे जॉनी , पोर्तुगालच्या कार्ला, ऑस्ट्रेलियाचे पॉल, अमेरिकेच्या पेज आणि राधा राधाकृष्णन, मलेशियाच्या कियात उपस्थित रहाणार आहेत.

70 वर्षांपूर्वी गुजरातमधील गांधीवादी कार्यकर्ते हरिवल्लभ पारीख यांनी अमेरिकेचे बॉब ल्युथर यांचे आग्रहावरून या संस्थेची स्थापना भारतामध्ये केलेली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार श्रीरंग बारणे व माजी खासदार अमर साबळे यांनी व्हिसा व इतर प्रक्रीयेसाठी सहकार्य केल्याचे अभय शहा यांनी सांगितले.

टॅग्स :Pune Newspune