Pune भटक्या आजारी गाईला तरूणांनी दिले जिवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : भटक्या आजारी गाईला तरूणांनी दिले जिवदान

जुनी सांगवी : जुनी सांगवी लक्ष्मीनगर एस टी कॉलनी जवळ चार दिवसांपूर्वी एक गाय भुक व तहानेने व्याकूळ होवून रस्त्याकडेला निपचित पडली होती. ही गोष्ट लक्षात येताच स्थानिक शंभो ग्रुपच्या रुपेश पुजारी,प्रतिक ढोरे,गौरव पिंपरे,मयूर सर्वगोड, दत्ता म्हेत्रे व त्यांच्या सहकारी मित्रांनी तिला पाणी व चारा कुट्टी देवून निपचित पडलेल्या गाईची सुश्रुषा केली.

तात्काळ महापालिकेच्या आरोग्य अधिका-यांना कळवून गाय आजारी असल्याची माहिती दिली.महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तात्काळ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले.डॉक्टरांकडून ग्लुकोज,सलाईन,मल्टीविटॅमिन,ॲंटिबायटिक औषधे देवून उपचार करण्यात आले.

मात्र यामुळे पुन्हा शहर व उपनगरातील रस्त्यावर फिरणा-या भटक्या प्राण्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जुनी सांगवी येथे काही वर्षांपूर्वी भटक्या जनावरांसाठी मध्यवर्ती ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी हौद बांधण्यात आले होते.मात्र ही संकल्पना नंतर बासणात गुंडाळण्यात आली.हौदात कधीही पाणी आलेच नाही.

कचराकुंड्या हटविल्याचाही भटक्या जनावरांवर परिणाम?

कचराकुंड्यांमधे भाजी विक्रेत्यांकडून टाकण्यात येणारा भाज्यांचा पाला, खराब झालेल्या टाकाऊ भाज्या, हॉटेल,खानावळीतील शिल्लक अन्न यावर या भटक्या जनावरांचा गुजारा असायचा.सध्या मात्र कचराकुंड्या मुक्त प्रभागामुळे परिसर कुंड्यामूक्त झाल्याने भटक्या जनावरांवर संक्रांत आली आहे.

परिसर स्वच्छ होतानाच मुक्या प्राण्यांचीही पालिकेने व्यवस्था करावी.अशी मागणी प्राणीमित्रांकडून होत आहे. कोट- शहरातील भटक्या जनावरांबाबत भूतदया दाखवून महापालिकेकडून त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था करणे, आवश्यक आहे. प्रशांत शितोळे माजी नगरसेवक.

कोट- जुनी सांगवी येथून आजारी गायीबाबत माहीती मिळताच आमच्या वैद्यकीय टीमकडून औषधौपचार केले. भूक व शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने तिला अशक्तपणा आला होता.स्थानिक युवकांनी याबाबत मोलाचे योगदान दिले. संबंधित गाईच्या कानावर बिल्ला टोकण आहे.ती भटकी नसावी.त्या गायीचा कोणीतरी मालक असावा मात्र कुणीही पुढे येत नाही.

अरूण दगडे पशुवैद्यकीय अधिकारी-

कोट- सांगवी परिसरात गायी म्हशीचे चार गोठे आहेत.मात्र गायीसाठी गेली चार दिवसांपासून कुणीही पुढे आले नाही.आम्ही तिची चार दिवसांपासून काळजी घेत आहोत.पुणे हद्दीतील भूगाव येथील रेस्क्यू टीमला याबाबत कळवले आहे.- रूपेश पुजारी