
पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने ‘माझी झेडपी माझा अधिकार’ संगणक प्रणाली विकसित
पुणे - पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात येणाऱ्या विकासकामांविषयी नागरिकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेने ‘माझी झेडपी माझा अधिकार’ ही संगणक प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीवर जिल्ह्यातील नागरिक झेडपीच्या विकासकामांबाबतचा आपापला अभिप्राय नोंदवू शकणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या प्रणालीला सुरवात करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
जिल्ह्यातील नागरिकांना या प्रणालीद्वारे या प्रणालीद्वारे आपापला तालुका व गाव निवडता येणार आहे. गावाची निवड केल्यानंतर त्या त्या त्या गावातील विकासकामांची यादी संबंधित नागरिकाला दिसू शकणार आहे. या विकासकामांबाबत नागरिक प्रतिक्रिया देऊ शकतील. त्या कामांचे छायाचित्रही अपलोड करू शकणार आहेत शिवाय कामांच्या दर्जाबाबत गुणांकन करून गुणही देऊ शकणार आहेत. या गुणांच्या आधारे संबंधित काम चांगले आहे का, सुधारणेला वाव आहे का, कळू शकणार आहे.
अशी वापरा प्रणाली
या प्रणालीच्या माध्यमातून आपापल्या गावातील विकासकामांचे मूल्यमापन करण्यासाठी नागरिकांना पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या punezp.mkcl.org या संकेतस्थळावर जावे लागेल. या संकेतस्थळावर गेल्यानंतर ‘विशेष मोहीम या शीर्षकाखालील ‘जिल्हा परिषदेच्या विविध योजनांसाठी महालाभार्थी’ पर्यायावर क्लिक करावा लागेल. यासाठी जिल्हा परिषदेच्या ‘महालाभार्थी’मध्ये आधार क्रमांकाच्या आधारे नोंदणी करावी लागेल. नोंदणी केलेल्या नागरिकांनाच या प्रणालीचा उपयोग करता येईल. नोंदणी केल्यानंतर ‘माझी झेडपी माझा अधिकार’ या पर्यायावर क्लिक करून या प्रणालीचा वापर करता येणार आहे.
सार्वजनिक कामाचे सामाजिक लेखापरीक्षण आणि कामाचा अभिप्राय प्राप्त करण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी केलेल्या सूचनेनुसार ही प्रणाली विकसित केली आहे. यामध्ये नागरिकांनी दिलेल्या गुणांकनांच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेने राबविलेल्या कामांचे मूल्यमापन करता येणार आहे. पारदर्शक व प्रगतिशील प्रशासनात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. हा सहभाग घेऊन जनतेच्या पैशातून होणाऱ्या कामांचा दर्जा चांगला राहावा आणि त्याबाबत त्यांचीच मते विचारात घेतली जावी, यादृष्टीने ही संगणक प्रणाली विकसित केली आहे.
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पुणे.
Web Title: Pune Zilla Parishad Developed My Zp My Rights Computer System
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..