esakal | कोविड रुग्णालयांचे फायर ऑडिट करणार; पुणे जिल्हा परिषदेचा निर्णय

बोलून बातमी शोधा

Pune ZP
कोविड रुग्णालयांचे फायर ऑडिट करणार; पुणे जिल्हा परिषदेचा निर्णय
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यातील सर्व सरकारी व खासगी कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचा आदेश पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी (ता.२१) सर्व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिला आहे. शिवाय या रुग्णालयांमधील संभाव्य धोके टाळण्यासाठीची मार्गदर्शक नियमावलीही तयार करण्यात आली आहे. या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरली आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, या उद्देशाने ग्रामीण भागात सुमारे ३५० कोविड केअर सेंटर आणि रुग्णालये कार्यान्वित करण्यात आले आहेत. यापैकी अनेक केअर सेंटर आणि रुग्णालयांची उभारणी खुपच घाई-घाईत करण्यात आली आहे. त्यामुळे विजेची जोडणी, ऑक्सीजन जोडणी यासारखी कामे घाईत पूर्ण करण्यात आलेली आहेत. त्यातच उपचारासाठीच्या विजेवर चालणाऱ्या अत्याधुनिक यंत्रांच्या वापरात वाढ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले.

हेही वाचा: पुणे जिल्हा प्रशासनाकडून रेमडेसिव्हीरचा पुरवठा; मात्र पुरेशा पुरवठ्याअभावी रुग्णांचे हाल

दरम्यान, नाशिक येथे घडलेल्या ऑक्सीजन गळतीच्या घटनेनंतर जिल्ह्यातील रुग्णालयांचे फायर ऑडीट अधिक वेगाने पूर्ण केले जाणार आहे. यामध्ये विजेपासून निर्माण होणारे संभाव्य धोके, जसे शॉर्ट सर्किट, आगीच्या घटना, ऑक्सिजनची संभाव्य गळती, ऑक्सीजन पाइपलाइनच्या जोडणीतील त्रुटी आणि आग विजविण्यासाठीचे प्राथमिक साहित्य आदी बाबींची काटेकोर तपासणी केली जाणार

आहे.

कोविड केअरची सेंटरची नियमावली

- स्वच्छतागृहे, बेड, लाइट, फॅन, पाणीपुरवठा आदी मूलभूत सुविधा अनिवार्य.

- स्वच्छता एजन्सी, स्वच्छतेसाठीचे साहित्य आणि कर्मचाऱ्यांसाठी पीपीइ किट बंधनकारक.

- वॉर्ड बॉय व टाचा एंट्री आॅपरेटर असावेत.

- सेंटरमधील कचऱ्याची घनकचरा व जैववैद्यकीय अशी दोन भागात विभागणी करावी.

- ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती व स्तनदा माता रुग्णांकडे विशेष लक्ष द्यावे.

- पोलिस शिपाई, होमगार्डची २४ तास नियुक्ती असावी.

- सेंटरवरील अनावश्यक गर्दी टाळावी.

- सर्व कर्मचाऱ्यांना अग्निशामक वापराचे प्रशिक्षण द्यावे.

- प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये ५ आॅक्सीजन सिलिंडर ठेवावेत.

कोविड रुग्णांलयांसाठी मार्गदर्शक सूचना

खासगी रुग्णालयांकडे ॲंटीजेन किट, बॉडी बॅग्ज यासारख्या प्राथमिक सुविधा असाव्यात.

- रेमडेसिविर, स्टेरॉईड, ऑक्सिजन वापर, पिपीइ किट आदींचे साप्ताहिक परीक्षण व तपासणी करून घ्यावी.

- ही तपासणी लेखा परीक्षकांकडून करण्यात यावी.

- रुग्णाचा मृतदेह बॉडी बॅग्जसह ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेकडे सुपूर्त करण्यात यावा.

- प्रत्येक वॉर्डात मोबाईल चार्जिंग सुविधा असावी.

- रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरील गर्दी टाळावी.

- रुग्णांना मोबाईल वापरण्यास परवानगी द्यावी.