esakal | पुणे जिल्हा प्रशासनाकडून रेमडेसिव्हीरचा पुरवठा; मात्र पुरेशा पुरवठ्याअभावी रुग्णांचे हाल

बोलून बातमी शोधा

पुणे जिल्हा प्रशासनाकडून रेमडेसिव्हीरचा पुरवठा; मात्र पुरेशा पुरवठ्याअभावी रुग्णांचे हाल
पुणे जिल्हा प्रशासनाकडून रेमडेसिव्हीरचा पुरवठा; मात्र पुरेशा पुरवठ्याअभावी रुग्णांचे हाल
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : जिल्हा प्रशासनाकडून थेट कोविड रुग्णालयांना रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून रुग्णांना रेमडेसिव्हीर मिळण्यास बऱ्यापैकी मदत होत आहे. परंतु रुग्णालयांना अद्याप गरजेच्या तुलनेत रेमडेसिव्हीर कमीच उपलब्ध होत आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांसह नातेवाइकांचे हाल सुरूच असल्याचे चित्र बुधवारी दिसून आले.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील २८४ कोविड रुग्णालयांना बुधवारी प्रशासनाकडून चार हजार ९०४ रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा साठा देण्यात आला. परंतु गरजेच्या तुलनेत हे प्रमाण कमीच आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनयुक्त आणि अतिदक्षता विभागातील रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत रेमडेसिव्हीर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. परंतु खाटांअभावी कोविड केअर सेंटर आणि अलगीकरण केंद्रांतील (आयसोलेशन सेंटर) रुग्णांनाही त्याची गरज भासत आहे. कोरोना बाधितांची संख्या पाहता सुमारे ४० हजार रुग्णांना रेमडेसिव्हीर लागणार आहेत. मात्र, त्या प्रमाणात अजूनही उपलब्ध होत नाहीत.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यासाठी मंगळवारी तीन हजार २४८ रेमडेसिव्हीर; ऑक्सिजनच्याही मागणीत वाढ

राज्यात पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी रेमडेसिव्हीर पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून करण्यात येत आहे.

अलगीकरण केंद्रांमधील रुग्णांनाही रेमडेसिव्हीर

कोविड रुग्णालयात खाटा नसल्यामुळे स्वयंसेवी संस्थांच्या खासगी कोविड केअर सेंटर आणि अलगीकरण केंद्रांमध्ये रुग्ण दाखल होत आहेत. कोविड रुग्णालयनिहाय रेमडेसिव्हीर देण्याचे प्रशासनाचे धोरण आहे. त्यामुळे अलगीकरण केंद्रातील रुग्णांना रेमडेसिव्हीर मिळत नाही. तेक्षील डॉक्टर रुग्णांना बाहेरून रेमडेसिव्हीर आणण्यास सांगत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिव्हीरच्या शोधात फिरावे लागत आहे.

रेमडेसिव्हीर वितरणात पारदर्शकता

रेमडेसिव्हीरच्या वितरणाबाबत पारदर्शकता यावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी रुग्णालयनिहाय रेमडिसिव्हीर वाटप, वितरक आणि मोबाईल क्रमांकासह यादी जिल्हाधिकारी कार्यालय पुणेच्या pune.gov.in आणि https://.pune.gov.in/corona-virus-updates/. या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिली. जिल्ह्यातील ५४० खासगी रुग्णालयांना ३२ हजार ६१ रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सचे वितरण करण्यात आले आहे. त्यापैकी २० आणि २१ एप्रिल या दोन दिवसांत रुग्णालयांना ऑक्सिजन बेडच्या संख्येनुसार आठ हजार १०० रेमडिसिव्हीर वितरीत केल्या आहेत. रेमडिसिव्हीर पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी