'बेरोजगारांना बनविणार उद्योजक'

गजेंद्र बडे 
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार आयुष प्रसाद यांनी स्वीकारला. जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना उद्योजक बनविणे, कालबाह्य योजना बंद करून समाजाच्या विकासाशी निगडित नव्या योजना अमलात आणणे, झेडपीला डिजिटल करण्याचा संकल्प केल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रश्‍न - जिल्ह्यातील विकासकामांबाबत आपण काही ध्येयधोरणे निश्‍चित केली आहेत का? 
आयुष प्रसाद -  जिल्हा परिषदेच्या अनेक योजना या नागरिकांसाठी किरकोळ लाभ देणाऱ्या, तर काही पूर्णपणे कालबाह्य झालेल्या आहेत. त्या सर्व बंद करून नवीन स्वरूपात, काळानुरूप आणि सर्वसमावेशक योजना सुरू करणे, बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देणे, डिजिटल जिल्हा परिषद बनविणे आदींची ध्येयधोरणे निश्‍चित केली जाणार आहेत.

प्रश्‍न - नव्या ध्येयधोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करणार?
- विभागनिहाय सर्व योजना आणि उपक्रमांचा आढावा घेणार आहे. त्यानंतर ती सुरू ठेवायची की बंद करून नवी योजना सुरू करायची, याबाबतचा निर्णय घेणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रश्‍न - बेरोजगारांना उद्योजक बनविण्यासाठी काही नवीन योजना अमलात आणणार का?
- जिल्ह्यातील विविध कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. त्यांच्या मदतीने संबंधित कंपन्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठीच्या शाखा (फ्रॅंचाइजी) सुरू करून दिल्या जातील. यासाठी आवश्‍यक असणाऱ्या खर्चापैकी २० टक्के जिल्हा परिषदेच्या निधीतून, तर उर्वरित ८० टक्के खर्चाचे बॅंकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्याचे विचाराधीन आहे. 

प्रश्‍न - प्रशासकीय कामकाज पद्धतीत सुधारणा म्हणजे डिजिटल झेडपी, असे वाटते का?
- नाही, फेसबुक, व्हॉट्‌सॲप यासारख्या सोशल मीडियाचा आधार घेतला जाणार आहे. जिल्हा परिषदेचे स्वतंत्र फेसबुक पेज तयार केले आहे. रोज घेतलेले निर्णय व्हॉट्‌सॲपच्या माध्यमातून पोचविले जाणार आहेत. 

(उद्याच्या अंकात बांधकाम सभापती प्रमोद काकडे.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune ZP CEO Ayush Prasad interview