#PunekarDemands पर्यावरण : जैवविविधतेचा वारसा जपा

Environment
Environment

लोकसभा निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष जाहीरनामे घेऊन बाहेर पडतील. आश्‍वासनांचा महापूर दारात येईल. या पार्श्‍वभूमीवर सजग पुणेकर म्हणून आपले प्रश्‍न आणि त्या प्रश्‍नांवर तज्ज्ञांनी सुचविलेली उत्तरे ‘सकाळ’मध्ये प्रकाशित करीत आहोत. या चर्चेतून पुणेकरांचा जाहीरनामा तयार व्हावा आणि भविष्यातील पुण्याला दिशा मिळावी, अशी अपेक्षा आहे. चर्चेत सहभागी व्हा. सोशल मीडियावर #PunekarDemands हॅशटॅग वापरून मत मांडा. 
ई मेल - webeditor@esakal.com

पुण्याला ऐतिहासिक वारसा जसा लाभला आहे, तसाच जैवविविधतेचा वारसाही लाभला आहे. आता हा वारसा जपणं हे आपल्या सर्वांच्या हातांत आहे. यासाठी प्रामुख्याने आपल्या पुण्याला लाभलेल्या नैसर्गिक वारशाचे संग्रहालय उभे करणे. ज्यात पुण्याची जैवविविधता फोटो, पुतळे, काही आराखडे अशा माध्यमातून सर्वांसमोर मांडता येईल. याच्या जोडीला निसर्ग विषयात मराठी इंग्रजी भाषेत उपलब्ध असलेल्या पुस्तकांचे एक वाचनालय करणे. याचबरोबर आणखी काही गोष्टी आपल्या सर्वांना करता येतील..

  पुणे परिसरात असलेल्या पाणथळ जागांचे संवर्धन करणे. या जागा स्वच्छ ठेवून त्या वाचवणे गरजेचे आहे. जेणेकरून इथे अधिकाधिक पक्षी येतील. पर्यायाने पर्यटन आणि स्थानिक रोजगार वाढीस लागेल.
  अशा जागांची आणि पक्ष्यांची माहिती देणारे मार्गदर्शक तयार करणे. या जागांच्या ठिकाणी निसर्ग परिचय केंद्र बनवणे.
  पुण्याच्या जैवविविधतेचे दर्शन घडवणारे चित्रपट महोत्सव दरवर्षी आयोजित करणे. जेणेकरून पुण्यातील जैवविविधता सर्वांसमोर येईल आणि त्यातून जैवविविधतेचा अभ्यास करण्यात गोडी निर्माण होईल.
  जखमी वन्यप्राणी अथवा खासकरून पक्षी यावर वेळेवर उपचार व्हावेत, यासाठी प्रत्येक प्रभागात उपचार केंद्रे बनवणे.
  पुण्यात असलेल्या सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायांमध्ये वाढ करून रोज रस्त्यावर आढळून येणारी गाड्यांची संख्या कमी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

************************************************************************

नदीपात्र सुशोभित नव्हे; शुद्ध व्हावे
अभिजित घोरपडे

पर्यावरण अभ्यासक, संपादक, भवताल कचरा ही केवळ पुण्याचीच नव्हे; तर राज्याची, देशाची आणि जगाची समस्या आहे. हा मुद्दा राजकीय पक्षांच्या प्राधान्यावर असायला हवा.

त्यासाठी केवळ कचरा उचलणे आणि जिरवणे किंवा निविदा काढून मोकळे होणे, हा उपाय नव्हे; तर लोकांना जागरूक करून त्यांचा सहभाग घ्यायला हवा. या समस्येवर शाश्वत उपाययोजना करावयाची असेल, तर लोकांनीच त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची जबाबदारी राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांना पार पाडावी लागेल.

शहरातील नद्या व ओढे-नाले हे केवळ सांडपाणी, मैलापाणी आणि कचरा वाहून नेणारे प्रवाह बनले आहेत. सांडपाण्याचे शुद्धीकरण पुरेशा क्षमतेने होत नाही. त्याची मुळातच क्षमता कमी आहे आणि आहे त्या क्षमतेचा पुरेपूर वापरही करून घेतला जात नाही. त्यामुळे सांडपाणी, मैलापाणी प्रवाहांमधून वाहते.

अलीकडे नदीपात्राचे सुशोभीकरण, नदीपात्रातून जलवाहतूक अशा ‘ग्लॅमरस’ गोष्टींची चर्चा केली जाते. पण, मुळात नदीचा जीव आणि त्यासोबत लोकांचा जीव गुदमरला जातोय, याकडे लक्ष दिले जात नाही. ते आधी ठीक करा. नदी शुद्ध, नैसर्गिक स्थितीत असेल, तर सुशोभीकरणावर खर्च करण्याची गरजच राहणार नाही.

वाहतूक कोंडी आणि हवेच्या प्रदूषणाबाबत पुण्याची वाटचाल राजधानी दिल्लीच्या दिशेने सुरू आहे. त्याचा परिणाम वातावरणात कार्बन वायूंचे प्रमाण वाढण्यावर आणि पर्यायाने नागरिकांच्या जीवनमानावर होत आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे, हा महत्त्वाचा मुद्दा असायला हवा. पुण्यात मेट्रो आल्यामुळे वाहतुकीचे सर्व प्रश्न सुटतील, असा समज असेल, तर ते अर्धसत्य आहे. मेट्रोचा फायदा होईलच, पण पुण्यात रस्ते वाहतूक सुधारल्याशिवाय तरणोपाय नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com