पुणेकर अडकले वाहतूक कोंडीत!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

पुणे : आठवड्याचा पहिला दिवस.. सकाळी शाळा, कार्यालयाला निघण्याची घाई...  तेवढ्यात पावसाने लावलेली हजेरी... त्यात रस्त्यावर बंद पडलेले सिग्नल, रस्त्यावरील खड्डे, धिम्या गतीने चालणारी रस्त्याची कामे आणि बेशिस्त वाहतूक यामुळे शहरातील सर्व रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे तीस मिनिटांचा रस्ता पार करण्यासाठी एक ते दीड तासाचा वेळ लागत होता.  पुणेकरांनी पुणे पोलिसांना  ट्विटर टॅग करुन वाहतूक कोंडीची माहिती दिली. 

सातारा मुंबई महामार्गावर वडगावजवळील पुलावर दोन तासापेक्षा अधिक वेळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे या मार्गावर चार ते पाच किलोमीटर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. सातारा रस्त्यावर बीआरटीचे काम चालू असल्याने रस्त्यावर खडे पडल्याने तसेच सिग्नल बंद असल्याने पद्मावती, नातू बाग, डी मार्ट, पुष्पमंगल चौक, सिटी प्राईड, पंचमी हॉटेल याठिकाणी वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

सिटी प्राईड चौकात सिग्नललाच खडे पडल्याने याठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. आठवड्याची सुरुवातच पावसाने सुरू झाल्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहन चालकांना रस्त्यावरील खड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्यावरील खड्डे, बेशिस्त वाहतूक आणि त्यात पाऊस त्यामुळे सिंहगड रस्त्यावरून महापालिका पर्यंत येण्यासाठी दररोज तीस मिनिटे लागतात. मात्र आज जवळपास दीड तास लागत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. 

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खडी मशिन चौक येथे अवजड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी ही नेहमीचीच. पण पाऊस आणि खड्डे यामुळे या रस्त्यावर वाहनांच्या प्रचंड लांब रांगा लागल्या होत्या. अशीच परिस्थिती स्वारगेट ते गोळीबार मैदानापर्यंत मार्गाची होती. तर बिबवेवाडी परिसरात संथ गतीने वाहतूक चालू होती.

गाडीतळ ते पुलगेट पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांचा बराच वेळ रस्त्यावर गेला. याचबरोबर भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, बीएमसीसी ते डेक्कन या मार्गावरही वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावर दररोज दहा मिनिटांमध्ये पार होणाऱ्या अंतरासाठी आज मात्र चाळीस मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ लागत होता. तसेच कर्वे रस्ता आणि कोथरूड या रस्त्यावर मेट्रो मार्गाचे होणारे काम, रस्त्यावरील खड्डे आणि पाऊस यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

औंध ते शिवाजीनगरच्या विद्यापीठ रस्तावरील ब्रेमेन चौक, विद्यापीठ चौक आणि कृषी महाविद्यालय चौक येथील सिग्नल बंद पडल्याने या मार्गावरील वाहतूक संथ गतीने चालू होती. तर संगमवाडीकडून येणाऱ्या दुहेरी उड्डाण पुलावर शिवाजीनगर येथे वाहतूक कोंडी झाली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punekare stuck in traffic!