
पुणे - जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेला गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) रुग्णांचा उद्रेक आता मार्च महिन्यापासून उतरणीला लागला आहे. आतापर्यंत (१६ मार्च) २३० रुग्णांचे निदान झाले असून त्यापैकी १८३ रुग्ण (८० टक्के) बरे होऊन घरी गेले आहेत, तर सध्या ३५ रुग्णांवर (१५ टक्के) उपचार सुरू असून १२ रुग्णांचा (५ टक्के) मृत्यू झाला आहे. आता नवीन रुग्णांची संख्या घटली असून, मृत्यूदेखील घटल्याचे दिलासादायक चित्र दिसून येत आहे.
नववर्षाच्या मुहूर्तावरच पुणे शहराच्या सिंहगड रस्ता परिसरात अचानक ‘जीबीएस’चे रुग्ण वाढायला सुरुवात झाली. आधी उलट्या-जुलाब व नंतर हातापायांतील शक्ती जाऊन रुग्णाचे शरीर लुळे पडायला लागले. दररोज सरासरी चार ते पाच असे रुग्ण आढळायला लागले व जानेवारी महिन्याच्या अखेरीस रुग्णसंख्या १३० झाली.
त्यातच या आजाराचा पहिला बळी हा धायरी येथे राहणाऱ्या सनदी लेखापाल तरुणाचा सोलापुरात २७ जानेवारीला गेला. त्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच भीती निर्माण झाली होती. तर फेब्रुवारीअखेर रुग्णसंख्या २२१ झाली. मार्चमध्ये केवळ नऊ नवीन रुग्ण आढळले व एकूण संख्या २३० वर पोचली.
रुग्णांची संख्या वाढायला लागल्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागासह राज्याचा साथरोग विभाग, पाणीपुरवठा विभाग, पशुसंवर्धन विभाग यांनी कारणांचा शोध घेण्यासाठी पाणी, रुग्णांचे रक्ताचे, लघवी व शौचाचे नमुने तपासणीला पाठवले. त्यापैकी काही नमुन्यांमध्ये ‘जीबीएस’ला कारणीभूत ठरणारा कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी हा जिवाणू आढळला, तसेच पाण्याचे स्रोत दूषित आढळले.
त्यापैकी नांदेडच्या विहिरीत निर्जंतुकीकरण होत नसल्याचे आढळून आल्याने येथे केंद्राचे पथकही येऊन पाहणी करून गेले. दरम्यान, मृतांची संख्याही वाढत होती. तसेच उपचारांचा खर्चही काही लाखांत गेल्याने मदतीच्या घोषणा झाल्या. आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये दुर्दैवाने तरुणांची संख्या जास्त आहे.
दरम्यान, नवीन रुग्णांची व मृतांची संख्या घटली असली, तरी अजूनही १६ रुग्ण व्हेंटिलेटवर उपचार घेत आहेत. तर २४ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. व्हेंटिलेटरवरील रुग्ण हे जोखमीच्या गटात असल्याने हे चिंतेचे कारण आहे. यातील आठवड्यातून दोन ते तीन रुग्ण बरे होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
महापालिकेने शहर व उपनगरांत नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत केलेल्या उपाययोजनांमुळे आता ‘जीबीएस’चा धोका भविष्यात पुन्हा संभवेल अशी शक्यता वाटत नाही. रुग्ण ‘जीबीएस’मधून बरे झाले आहेत. त्यापैकी बहुतेक रुग्णांना पूर्णपणे बरे वाटत नाही. त्यांच्या हाता-पायांना ताकद आलेली नाही, तर काहींना व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागत आहे.
- डॉ. अमित द्रविड, संसर्गरोगतज्ज्ञ, नोबल रुग्णालय
उन्हाळ्यात काय काळजी घ्याल?
स्वच्छ, महापालिकेने क्लोरिनची मात्रा टाकून स्वच्छ केलेले पाणी प्यावे
उकळून गार केलेले पाणी किंवा निर्जंतुकीकरण केलेले पाणी (आरओ) प्यावे
शिळे अन्न, कच्चे शिजवलेले कोंबडीचे मांस खाऊ नये
कोंबडीच्या न शिजवलेल्या मांसाशी संपर्क आल्यानंतर हात व इतर वस्तू स्वच्छ धुऊन घ्याव्यात
सद्यःस्थिती
नवे रुग्ण - नाहीत
एकूण रुग्ण - २३० (पुणे शहर - ४६, शहरात नव्याने समावेश झालेल्या गावांतील रुग्ण - ९५, पिंपरी चिंचवड- ३४, पुणे ग्रामीण- ४०, इतर जिल्ह्यातील- १५)
अतिदक्षता विभागात - २४
‘व्हेंटिलेटर’वर - १६
बरे झालेले - १८३
मृत्यू - १२
आरोग्य विभागाच्या उपाययोजना
पुणे व पिंपरी चिंचवड व ग्रामीणमध्ये केलेले सर्वेक्षण - ८९ हजार घरे
पाणी नमुने तपासणीला पाठवले - ७,२६२
दूषित आलेले नमुने - १४४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.