Pune Airport : पुण्यातून दिवसा विमानप्रवास शक्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Airport

Pune Airport : पुण्यातून दिवसा विमानप्रवास शक्य

पुणे : लोहगाव विमानतळावरून शनिवारपासून प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. त्यासाठी तिकिटांची आरक्षणे करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, रात्री आठ ते सकाळी आठ दरम्यान वाहतूक बंदच राहणार आहे. रात्रीची विमान वाहतूक सुरू होण्यासाठी पुणेकरांना आणखी दोन महिने वाट पहावी लागणार आहे.

लोहगाव विमानतळावरून वाहतूक १६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान बंद ठेवण्यात आली आहे. या दरम्यान धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम हवाई दलाकडून करण्यात आले आहे. आता ३० ऑक्टोबरपासून वाहतूक सकाळी आठ ते रात्री आठ दरम्यान सुरू होणार असल्याची माहिती विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली. विमानतळ बंद होते, त्या कालावधीत विमानतळावरील अनेक प्रलंबित कामे पूर्ण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

विमानतळाच्या आतील भागात तसेच सिक्युरिटी झोनमधील फरशा बदलण्यात आल्या आहेत. तसेच प्रवाशांच्या तपासणीसाठीच्या स्कॅनरच्या संख्याही वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता विमानतळावर ६ स्कॅनर झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचू शकेल, असेही ढोके यांनी सांगितले. विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्ताही काही प्रमाणात रुंद करण्यात आला आहे. त्यामुळे विमानतळासमोर होणारी कोंडी काही प्रमाणात कमी होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून रात्रीची विमान वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, त्या बाबतचा अंतिम निर्णय हवाई दलाकडून घेण्यात येईल, असेही ढोके यांनी स्पष्ट केले.

पुण्याहून २५ शहरांशी संपर्क

पुण्यावरून दिल्ली, अहमदाबाद, कोलकत्ता, चेन्नई, जयपूर, लखनौ, नागपूर, प्रयागराज आदी २५ शहरांसाठी विमान वाहतूक सुरू होणार आहे. विमानतळावर १६ ऑक्टोबरपूर्वी रोज सरासरी १५ ते १८ हजार प्रवाशांची ये-जा होत होती. विमानतळ सुरू होणार असल्यामुळे उद्योजक, नोकरदार, पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे.

"लोहगाव विमानतळ डिसेंबरपासून २४ तास खुला होत आहे, ही समाधानाची बाब आहे. तसेच पुण्याची एअर कनेक्टिव्हिटी आणखी शहरांशी वाढावी, तसेच आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक पुण्यातूनही सुरू व्हावी, यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरतर्फेही संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू आहे."

- सुधीर मेहता, अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर

Web Title: Punes Lohegaon Airport After Reopening On October 30 No Night Flights Yet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punepune airport
go to top