पुणेकर महिला झाली अमेरिकेत कौन्सिल मेंबर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Punes woman Rutuja Indapure becomes council member in America

पुणेकर महिला झाली अमेरिकेत कौन्सिल मेंबर

पुणे : सामाजिक कार्याची आवड असेल, तर भाषा, प्रांत यांचा अडथळा येत नाही, हे एका पुणेकर महिलेने सिद्ध करून दाखविले आहे. ऋतुजा इंदापुरे यांनी अमेरिकेतील सिऍटल जवळील समॅमिश शहराच्या कौन्सिल मेंबर होण्याचा बहुमान नुकताच पटकावला आहे. राष्ट्रीय बॅडमिंटनपटू असलेल्या इंदापुरे यांचे स. प. महाविद्यालय आणि आयएलएस विधी महाविद्यालयात शिक्षण झाले. त्यानंतर इंग्लंडमधून त्यांनी एल. एल. एम. केले. लग्नानंतर १९९७ मध्ये त्या अमेरिकेत गेल्या आणि स्थायिक झाल्या. तेथे सॉफ्टवेअर क्षेत्रात त्यांनी झेप घेतली. आता एका कंपनीत त्या अधिकारी आहेत.

त्यांचे पती दिनेश कोरडे हे एका बहुराष्ट्रीय कंपनीत अधिकारी असून, मुलगी वॉशिंग्टन डीसी या शहरात सरकारी नोकरी व मुलाचे शिक्षण सुरू आहे. समॅमिश शहरात २०१७ मध्ये त्यांनी कौन्सिल मेंबर पदासाठी निवडणूक लढविली होती. पण त्यांचा विजय थोडक्यात हुकला. त्यानंतर कौन्सिलरच्या दोन जागा रिक्त झाल्यावर स्थानिक प्रशासनाने त्या भरण्यासाठी अर्ज मागविले. त्यात इंदापुरे यांचाही अर्ज होता. मुलाखतीच्या प्रक्रियेदरम्यान सामाजिक उपक्रमांतील त्यांचा सहभाग लक्षात घेऊन त्यांची १२ जुलै रोजी निवड झाली. त्यात ६ ज्युरी होते. त्या सगळ्यांनी एक मताने त्यांची निवड केली.

तेथील राज्य सरकारनेही त्यांच्या नियुक्तीला नुकतीच मान्यता दिली आणि त्या कौन्सिल मेंबर म्हणून काम पाहत आहेत. इंदापुरे या वॉशिंग्टन राज्याच्या स्टेट वुमन्स कमिशनच्याही अध्यक्षा आहेत. २०१८ मध्ये त्यांची तेथील गव्हर्नरने नियुक्ती केली. तसेच अनेक सामाजिक, सांस्कृतिक संघटनांत त्या सक्रिय आहेत. ‘सकाळ’शी बोलताना इंदापुरे म्हणाल्या, ‘‘समॅसिस शहरात एकूण ७ कौन्सिल मेंबर आहेत. त्यात माझाही समावेश झाला आहे. शहरातील नगर नियोजनाच्या कामावर लक्ष देतानाच नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न असेल. देश कोणताही असो, प्रामाणिकपणाने काम केले तर, कोणत्याही देशातील नागरिकाचा विश्वास संपादन करता येतो, हे दिसून आले. अधिक जोमाने आणि चांगल्या पद्धतीने अजून काम करण्याचा मानस आहे.’’

Web Title: Punes Woman Rutuja Indapure Becomes Council Member In America

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top