#PuneTraffic वाहतूक कोंडीत डॉक्‍टरच्या मदतीने रिक्षातच प्रसूती

कैलास गावडे
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

मुंढवा - घोरपडी येथे वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या महिलेची रिक्षातच प्रसूती करण्याची वेळ आली. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता घडली. मात्र, एक महिला डॉक्‍टर देवाच्या रूपाने धावून आल्यामुळे बाळासह आईची तब्येत सुखरूप आहे. 

मुंढवा - घोरपडी येथे वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या महिलेची रिक्षातच प्रसूती करण्याची वेळ आली. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता घडली. मात्र, एक महिला डॉक्‍टर देवाच्या रूपाने धावून आल्यामुळे बाळासह आईची तब्येत सुखरूप आहे. 

घोरपडी येथील पंचशील नगरमधील नीता खुळे यांना मंगळवारी दुपारी प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. त्यामुळे लगेचच रिक्षामध्ये घेऊन त्यांचा पती बंडू खुळे व जाव मुंढवा येथील कै. सखाराम कोद्रे कुटीर रुग्णालयाकडे निघाले. त्याचदरम्यान, अनंत चित्रपटगृहाजवळील रेल्वे गेट बंद होणार होते. त्यामुळे वाहनचालकांची पुढे जाण्यासाठी घाई सुरू झाली अन त्यातून तेथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. परिणामी, नीता यांना घेऊन जाणारी रिक्षाही या कोंडीत अडकली. त्यामुळे त्यांना पुढे जाता येत नव्हते. त्याचवेळी नीता यांना तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यामुळे चालकाने रस्त्याच्या कडेलाच रिक्षा थांबविली. 

दरम्यान, याच रस्त्यावरून डॉ. विद्या माने आपल्या दवाखान्यात जात होत्या. त्यांचे लक्ष नीताकडे गेले. त्यांनी तेथे जमलेल्या नागरिकांसह महिलांना बाजूला केले. त्यानंतर एकंदर परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांनी नीताची प्रसूती रिक्षातच करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी काही महिलांना रिक्षाभोवती उभे केले अन सुरक्षित प्रसूती केली. यात नीता यांना मुलगी झाली. दरम्यानच्या कालावधीत वाहतूक कोंडी कमी झाली अन डॉ. माने यांनी नीता व बाळाला तत्काळ दवाखान्यात नेले अन पुढील उपचार केले.

डॉ. विद्या माने यांना माझ्या व बाळाच्या मदतीसाठी देवाने पाठविले होते. त्या देवदूत बनून आमच्या मदतीसाठी धावून आल्या. त्यामुळेच मी आणि बाळ सुरक्षित आहोत. त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. 
- नीता खुळे, नवजात बाळाची आई 
 
दवाखान्यामध्ये जात असताना रेल्वे गेटजवळ वाहतूक कोंडी झाली होती. त्या वेळी एका महिलेला प्रसूतीवेदना होत होत्या. तिची रिक्षातच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. बाळाची नाळ रिक्षात कापली. त्यानंतर बाळाला दवाखान्यात नेले. तसेच, तेथील महिलांनी नीताला कापडात बांधून उचलून दवाखान्यात आणले. त्यानंतर बाळासह आईवर उपचार करण्यात आले.
- डॉ. विजया माने

Web Title: #PuneTraffic Delivery in Rickshaw due to traffic jam