
मामाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्याला २५ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा
पुणे - टीव्ही पाहण्यासाठी आलेल्या मामाच्या मुलीवर (Girl) अत्याचार (abusing) करणाऱ्यास न्यायालयाने २५ वर्ष सक्तमजुरी आणि ६० हजार रुपये दंडाची शिक्षा (Punishment) सुनावली आहे. पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांना हा निकाल दिला.
शिक्षा सुनावलेला २० वर्षीय तरुण हा कोथरूडमध्ये राहायला आहे. एक एप्रिल २०१९ रोजी कोथरूडमधील शास्त्रीनगरमध्ये हा प्रकार घडला होता. १३ वर्षीय मुलीवर झालेल्या या अत्याचारप्रकरणी तिच्या मावशीने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. संबंधित मुलगी ही येरवडा येथे रहायला आहे. मात्र शाळेला सुटी असल्याने ती तिच्या मावशीच्या घरी कोथरूड येथे रहायला गेली होती. घटनेच्या दिवशी ती तिच्या आत्याच्या घरी टिव्ही पाहण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्या आत्याचा मुलगा एकटाच घरी होता. टिव्ही पाहत असताना तो तिच्या जवळ आला आणि त्याने मुलीवर अत्याचार केला. त्यामुळे तिने मुलाच्या कानाखाली मारली व ती तेथून मावशीच्या घरी निघून गेली.
फिर्यादी या कामावरून घरी आल्यानंतर त्यांनी मुलीला रडताना पाहिले. त्यामुळे तिच्याकडे चौकशी केली असताना तिने सर्व प्रकार फिर्यादी यांना सांगितला. त्यामुळे त्यांनी त्वरित पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली, असे तक्रारीत नमूद आहे.
या गुन्ह्याचा तपास कोथरूड पोलिस ठाण्याच्या तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. जानकर यांनी केला. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे यांनी पाहिले. त्यांनी एकूण नऊ साक्षीदार तपासले. तसेच अशा गुन्ह्यात उच्च व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विविध न्याननिवाड्यांचे दाखले सादर केले.
दंडाची रक्कम मुलीला द्यावी :
संपत्तीच्या वादातून तक्रार देण्यात आली आहे, असा बचाव आरोपीच्या वकिलांनी केला. मात्र तपास अधिकारी जानकर यांनी केलेला तपास आणि सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद मान्य ग्राह्य धरीत न्यायालयाने तरुणाला २५ वर्षांची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम मुलीला देण्यात यावी. मात्र तरुणाने दंडाची रक्कम भरली नाही तर त्याला अतिरिक्त चार वर्ष शिक्षा भोगावी लागेल, असे आदेशात नमूद आहे.