esakal | पुरंदर विमानतळासाठीच्या भूसंपादनाचा प्रश्‍न मार्गी लागण्याची शक्‍यता
sakal

बोलून बातमी शोधा

airport

सर्व मान्यता मिळूनही भूसंपादनाअभावी रखडलेले या विमानतळाचे काम पुन्हा मार्गी लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

पुरंदर विमानतळासाठीच्या भूसंपादनाचा प्रश्‍न मार्गी लागण्याची शक्‍यता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित "छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळा'साठीच्या जागेचे भूसंपादन आणि मोबदला देण्यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी येत्या शुक्रवारी (ता. 28) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यामुळे सर्व मान्यता मिळूनही भूसंपादनाअभावी रखडलेले या विमानतळाचे काम पुन्हा मार्गी लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. विभागीय आयुक्त सौरव राव यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या बैठकीला महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अधिकारी, सिडको, पीएमआरडीए आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.

पुरंदर विमानतळासाठीच्या जागेपासून ते सर्व प्रकाराच्या मान्यता यापूर्वीच केंद्र आणि राज्य सरकराकडून देण्यात आला आहेत. केवळ भूसंपादन हा एक महत्त्वाचा टप्पा बाकी आहे. त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. यापूर्वी झालेल्या बैठकीत पवार यांनी पुरंदर विमानतळासाठी आवश्‍यक असलेल्या जागेचे भूसंपादन करण्याबरोबरच भूसंपादनासाठी चांगले अधिकारी नेमण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या. त्यानुसार चार उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे काम थांबले होते. 

विमानतळाच्या भूसंपादनासाठी यापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून चार पर्याय सुचविण्यात आले आहेत. या चार पर्यांचा प्रस्ताव यापूर्वीच राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यावर शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार आहे. आवश्‍यकता भासल्यास राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीकडे मान्यतेसाठी जावे लागणार आहे, असे राव यांनी सांगितले. 

हे वाचा - तुळजाभवानी मातेची शेकडो वर्षांची 'ही' परंपरा झाली यंदा खंडित 

पुरंदर येथे विमानतळ उभारण्यासाठी सुमारे 2 हजार 832 हेक्‍टर जागा लागणार आहे. या कामासाठी विमानतळ विकास कंपनीला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. 2 हजार 832 हेक्‍टर पैकी 2 हजार हेक्‍टरवर प्रत्यक्षात विमानतळ उभारण्यात येणार आहे. जागेच्या भूसंपादनासाठी सहा हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. विमानतळाचा मास्टर प्लॉन तयार करण्याचे काम यापूवीच कंपनीकडून डार्स या कंपनीला देण्यात आले आहे. तर उर्वरीत 832 हेक्‍टर जागेवर विमानतळासाठी आवश्‍यक त्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विकास आराखडा कंपनीकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून यापूर्वीच सात गावांमधील हद्दीचे नकाशे जाहीर करण्यात आले आहे. त्यावर नागरिकांकडून सूचना हरकती मागविण्यात आल्या आहेत. 

गावनिहाय भूसंपादन होणारे क्षेत्र पुढील 
- वनपुरी - 339 हेक्‍टर 
-उदाची वाडी - 261 हेक्‍टर 
-कुंभारवळण- 351 हेक्‍टर 
-एखतपूर -217 हेक्‍टर 
-मुंजवडी-143 हेक्‍टर 
-खानवडी- 484 हेक्‍टर 
-पारगाव-1037 हेक्‍टर 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

भूसंपादनाच्या मोबदला देण्यासाठीचे पर्याय 
-थेट खरेदीने म्हणजे एकरकमी मोबदला देणे 
-शेतकऱ्यांना शेती महामंडळाची पर्याय जागा देणे 
-मगरपट्टा सिटीच्या धर्तीवर विमानतळ विकास कंपनीमध्ये भागधारक म्हणून सहभागी करून घेणे 
- पर्यायी शेतजमिनी देणे आणि निर्वाह भत्ता देणे 

loading image
go to top