पुरंदरला सहा वर्षात 3,000 एकवरील डाळींबबागा तुटल्या; शेतकरी चिंतेत !

Purandar lost 3000 acres of pomegranate orchards in six years
Purandar lost 3000 acres of pomegranate orchards in six years
Updated on

सासवड(पुणे) : लागोपाठ तीन - चार वर्षांची टंचाई वा दुष्काळी स्थिती आणि त्यानंतरच्या दोन वर्षांच्या अतिवृष्टीमुळे पुरंदर तालुक्यातील सुमारे 3,000 एकरवरील जुन्या डाळींबाच्या बागा शेतकऱयांना तोडाव्या लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात सततच्या टंचाई, दुष्काळ, अतिवृष्टीबरोबरच हवामान बदलाचा व वाढत्या रोग - किडीच्या प्रादुर्भावाचा डाळींब क्षेत्र घटविण्यात मोठा वाटा आहे. या काळातच नव्या 800 एकर क्षेत्राची वाढ झाली, तर जुने 3,200 एकर क्षेत्र बचावल्याने 4,000 एकर क्षेत्र आज टिकून आहे. मात्र हे ही डाळींब क्षेत्र विविध रोगांना बळी पडतच आहे.  

खरे तर सहा वर्षांपूर्वी 7 हजार एकर डाळींब क्षेत्र वाढून ते दुप्पट म्हणजेच 14 हजार एकर होणे अपेक्षित होते. मात्र त्यात घट झाली, ही चिंतेची बाब आहे. दरम्यान, डाळींबाच्या अगोदरच्या आंबिया बहरासही जीवाणूजन्य (तेलकट डाग) व बुरशीजन्य ठिपक्याच्या रोगाचा प्रादुर्भाव बऱयाच डाळींब बागांमध्ये झाला होता. शिवाय मर आणि इतर प्रादुर्भाव होत असल्याने डाळींबाचे बाजारमुल्य घटते राहीले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मागील वर्षाच्या अतिवृष्टीने झालेल्या प्रादुर्भावातून डाळींब बागा बाहेर निघालेल्या नसतानाच, यंदा सतत उन - पावसाचा खेळ सुरु असल्याने रोगास पोषक हवामान तयार झाले. सध्याच्या मृग बहरातही पाऊस, ऊन, वारा, ढगाळ वातावरण, धुके अशा मिश्र वातावरणाने पिक व्यवस्थापन करण्यात अडथळे येत आहेत. त्यातून डाळींबावर विविध रोग - किडीचा प्रादुर्भाव होत असून कित्येक बागा तेलकट डाग, फळकुज, फुलगळ, मररोग, विशेषतः बुरशीजन्य रोग आदींना बागा बळी पडत आहेत. विविध फवारण्याही पावसात धुऊन गेल्याने.. नुकसानग्रस्त बागांचे प्रमाण 60 ते 70 टक्क्यांपर्यंत पोचल्याने याही बहरात डाळींब उत्पादन लक्षणीय घटण्याची शक्यता आहे. एकुणच या साऱया सततच्या संकटातून डाळींब उत्पादकांचे बागातील झाडांवर कुऱहाड चालविण्याचे धाडस वाढले. त्यातून पाच - सहा वर्षात सव्वातीन हजार एकर क्षेत्रातील बागा तुटल्या.  

सासवडच्या घाऊक बाजारपेठेत येणाऱया डाळींबात गुणवत्तापूर्ण डाळींबाची आवक 15 ते 20 टक्केच आहे. बाकी बहुतेक डाळींबाची फळे डाग लागलेली, रोग - किडीचा प्रादुर्भाव झालेली असल्याने बाजारमुल्य यंदा तर मोठे घसरलेले आहे. आवक कमी झाल्याने थोडे भाव वाढलेत. पण एकुणच वर्षभरात उत्पादनात किमान 40 टक्के घट व उत्पन्नात 60 टक्के घट होण्याची शक्यता डाळींब उत्पादक शेतकऱयांनी आज बोलून दाखविली. गतवर्षी बहुतेक भागात अतिवृष्टी, यंदाही अतिवृष्टी व हवामानात कमालीचा बदल.. त्यातून गतवर्षीपेक्षा यंदा डाळींब नुकसान खुपच आहे. 

  • टंचाई, दुष्काळ स्थितीपाठोपाठ अतिवृष्टी व सततचा पाऊस
  • रोग किड, बुरशीजन्य प्रादुर्भावात वाढ
  • सततच्या फवारण्यांनी उत्पादन खर्च वाढला
  • दुसरीकडे गुणवत्तेअभावी बाजारमुल्य घटल्याने पिक न परवडणारे होऊन बागा तुटल्या
  • लागवडीतील दोन झाडांतील अंतर योग्य न ठेवल्याने व शाखीय वाढ, हवा खेळती न राहणे, स्वच्छता अभावातून प्रादुर्भाव
  • छाटणीत कृषी शास्त्रशुध्द नियम न पाळल्याने जीवाणूंचा शिरकावा योग्य सल्ल्याशिवाय वारेमाप फवारण्या
  • रोग - किड व्यवस्थापन सर्वांनी एकसाथ व योग्य न करणे, एकात्मिकतेचा अभाव
  • पाऊस पडल्यानंतर आवश्यक निचरा न होणे  
  • कृषी विभाग बांधापर्यंत न येणे., हे सुध्दा रोग - किड वाढचे कारण
  • डाळींबापेक्षा पेरु व सीताफळात जोखीम कमी असल्याने शेतकरी तिकडेही वळतायेत

- क्षेत्र वाढीसाठी उपाययोजना

  • डाळींब बागेत लागवडीत योग्य अंतर ठेवणे, दाटी न करणे, स्वच्छतेवर भर हवा
  • द्राक्षपेक्षा डाळींब पिक नाजुक झालेय समजून लागवडीपासूनच पिक व्यवस्थापन हवे
  • कृषी शास्त्रशुध्द नियमातून रोग-किड व्यवस्थापन हवे
  • खते, फवारण्या, बहर नियोजनाचा आराखडा हाती हवा
  • आंबिया, हस्त, मृग तिन्हीपैकी किमान दोन बहरात विभागून पिक नियोजन करणे
  • तणनाशक न वापरता जमिनीतील जैविक जिवंतपणा ठेवावा
  • तणकाढणी करावी किंवा त्याचा शक्यतो आच्छादनास वापर करावा 

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''पुरंदरला डाळींबावर टंचाई, अतिवृष्टीचे व प्रादुर्भावाचे संकट आहेच. पण बागा तोडण्यापेक्षा आपले चुकते कुठे हे पहा. शेतकऱयांनी एकात्मिक पध्दतीने पिक व्यवस्थापन केले, तर नंबर एक प्रतिच्या डाळींबास नंबर एकचाच 100 ते 250 रुपये किलोचा भाव मिळतो. गेली सहा वर्षे माझे डाळींब युरोपला जातेय.'' 
- सुधीर निगडे, प्रयोगशिल डाळींब उत्पादक व सरपंच, कर्नलवाडी, ता. पुरंदर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com