विद्यार्थ्यांना बक्षिसावलंबी करु नका - परेश मोकाशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Purushottam karandak

‘पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या निकालानंतर ‘करंडक जिंकलात तरच तुम्ही मोठे, पारितोषिक नसेल तर जीवनात अर्थ नाही, असा एक संदेश पसरत आहे.

विद्यार्थ्यांना बक्षिसावलंबी करु नका - परेश मोकाशी

पुणे - ‘पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या निकालानंतर ‘करंडक जिंकलात तरच तुम्ही मोठे, पारितोषिक नसेल तर जीवनात अर्थ नाही, असा एक संदेश पसरत आहे. स्पर्धेची मौज लुटावी, कुठलाही निकाल आरामात स्वीकारावा, हा संस्कार आपण कधी करणार? त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहण्याच्या नादात त्यांना बक्षीसावलंबी करू नका’, असे प्रतिपादन यंदाच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे परीक्षक परेश मोकाशी यांनी गुरुवारी केले.

महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे यंदाच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या निकालावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात मोकाशी यांनी स्पर्धेच्या तिन्ही परीक्षकांच्या वतीने मनोगत मांडले. या चर्चासत्रात स्पर्धेच्या परीक्षक पौर्णिमा मनोहर, स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेचे चिटणीस राजेंद्र ठाकुरदेसाई आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे प्रमुख प्रवीण भोळे सहभागी झाले होते. रंगकर्मी मिलिंद शिंत्रे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

‘तुमचे दोष दाखवणारा, तुमच्यावर टीका करणारा, तुम्हाला करंडक न देणारा हा प्रत्येकवेळी तुमचा शत्रू नसतो. तो तुमचा हितचिंतक असण्याची शक्यता अधिक. आता तुम्हाला वाटते आहे की आम्ही तुमच्यावर अन्याय केला. यातून बाहेर येऊन तुम्ही विचार केला, तर तुम्हाला कदाचित आमचे म्हणणे पटेल’, असा सल्लाही मोकाशी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

‘गेल्या ५६ वर्षांत नाटकाच्या स्वरूपात अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे त्यावेळचे निकष लावून आत्ताची नाटके तपासता येणार नाहीत, हे संयोजकांनी ध्यानात घ्यावे’, अशी सूचना भोळे यांनी केली. ‘स्पर्धा सुरु करताना राजाभाऊ नातू यांनी स्पर्धेची उद्दिष्टे आणि नियम स्पष्ट केले होते. त्यावरच आजवर स्पर्धेची वाटचाल सुरु आहे. यंदाचा निकालही त्याच नियमांनुसार झाला आहे’, असे ठाकुरदेसाई यांनी स्पष्ट केले.

‘खऱ्या समस्यांवर बोलुया’

‘निकालावरून सगळीकडे होणारा गदारोळ, निषेध हा अचंबित करणारा आहे. निषेधच करायचा असेल महाराष्ट्रातील नाट्यगृहांची दुरावस्था झाली आहे, ज्येष्ठ लोककलावंतांना योग्य मानधन मिळत नाही, नव्या रंगकर्मींना अनुदाने मिळत नाहीत, अशा बाबींचा करायला हवा. त्यावर आंदोलन करायला हवे, यंत्रणांना जाब विचारायला हवा. ५७ वर्षे सातत्याने परिश्रमपूर्वक स्पर्धेचे आयोजन करणारी संस्था आणि आपल्या मतांशी प्रामाणिक असलेले परीक्षक हे ‘सॉफ्ट टार्गेट’ आहेत, म्हणून त्यांच्यावर हल्ला करू नये’, अशा शब्दांत प्रवीण भोळे यांनी टीका करणाऱ्यांचे कान टोचले.

Web Title: Purushottam Karandak Competition Drama Pune Reward Students Paresh Mokashi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..