11th Admission : तिसऱ्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी मंगळवारी होणार जाहीर

The quality list for the third regular round of the 11th entry will be announced on Tuesday
The quality list for the third regular round of the 11th entry will be announced on Tuesday
Updated on

पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची तिसरी नियमित प्रवेश फेरी जाहीर करण्यात आली आहे. एकूण एक लाख सात हजार 30 जागांकरिता राबविण्यात येत असलेल्या या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत 41 हजार 021 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आता उर्वरित 66 हजार नऊ विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फेऱ्या होणार आहेत. त्यातील तिसऱ्या प्रवेश फेरीअंतर्गत नियमित गुणवत्ता यादी येत्या मंगळवारी (ता. 15) जाहीर केली जाणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेश प्रक्रियेत पहिल्या फेरीत 24 हजार दोन तर दुसऱ्या फेरीत दहा हजार 861 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मात्र तरीही बारा हजारांहुन अधिक विद्यार्थ्यांनी दुसऱ्या प्रवेश फेरीत निवड होऊनही प्रवेश घेण्यासाठी कोणतीही हालचाल केली नसल्याचे दिसून आले आहे. प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज भाग-एकमध्ये आवश्‍यक ते बदल करण्यास आणि नियमित फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविण्यास विद्यार्थ्यांना गुरूवारपासून तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर प्रवेशाची गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर केली जाणार आहे. 

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक : कालावधी : कार्यवाहीचा तपशील

10 ते 12 डिसेंबर - विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भाग एक मध्ये आवश्‍यकता असल्यास बदल करणे आणि नियमित तिसऱ्याफेरीसाठी पसंतीक्रम नोंदविणे. यापुर्वी भरलेल्या भाग दोनमध्ये पसंतीक्रम बदलता येतील. मार्गदर्शन केंद्र/माध्यमिक शाळा विद्यार्थ्यांचे अर्ज प्रमाणित करतील. या कालावधीत नवीन विद्यार्थी प्रवेश अर्ज भाग-एक आणि भाग-दोन भरू शकतील. व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक कोटांतर्गत प्रवेशासाठी विद्यालयांना अर्ज मागविता येतील.

13 ते 14 डिसेंबर - डेटा प्रोसेसिंगसाठी राखीव वेळ

15 डिसेंबर - प्रवेश फेरीअंतर्गत प्रवेशासाठी निवड/गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे. विद्यार्थी लॉगिनमध्ये त्याला प्रवेशासाठी मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय दर्शविणे. संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयास प्रवेशासाठी मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी कॉलेज लॉगिनमध्ये दर्शविणे. कट ऑफ संकेतस्थळावर दर्शविणे आणि विद्यार्थ्यांना मोबाईल संदेश पाठविणे.

15 डिसेंबर (सकाळी साडे अकरा वाजल्यापासून) ते 18 डिसेंबर (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) - प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रोसिड फॉर ऍडमिशन करणे.  विद्यार्थ्यांनी मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश निश्‍चित करणे.

18 डिसेंबर : झालेले प्रवेश संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदविण्यासाठी उच्च माध्यमिक विद्यालयांना अतिरिक्त वेळ.

18 ते 19 डिसेंबर : अल्पसंख्याक कोटा आणि इनहाऊस कोटा अंतर्गत रिक्त राहिलेल्या जागा प्रत्यार्पित करण्यासाठी राखीव वेळ

20 डिसेंबर : प्रवेशाच्या विशेष फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे. (यात व्यवस्थापन, अल्पसंख्याक आणि इनहाऊस कोट्यातून प्रत्यर्पित केलेल्या रिक्त जागांचाही समावेश असेल.)

अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या फेऱ्यांचा तपशील :

प्रवेश फेऱ्या : फेरीसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी : प्रवेशासाठी निवड झालेले विद्यार्थी : प्रवेश घेतलेले विद्यार्थी
पहिली फेरी : 68,072 : 40,013 : 24,002
दुसरी फेरी : 46,794 : 23,120 : 10,861

नेमक्‍या किती प्रवेश फेऱ्या होणार?

अकरावीची प्रवेश प्रक्रिया दरवर्षी साधारणत: सहा ते सात फेऱ्यांमध्ये तर कधी त्यापेक्षाही अधिक फेऱ्यांमध्ये होते. त्यामुळे यंदा प्रवेशाच्या नेमक्‍या किती फेऱ्या असणार याबाबत विद्यार्थी-पालकांमध्ये उत्सुकता आहे. याबद्दल इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया समितीच्या सचिव मीना शेंडकर यांना विचारले असता, त्या म्हणाल्या, राज्य सरकारने अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप यापुर्वीच जाहीर केले आहे.

त्यानुसार प्रवेशाच्या नियमित तीन फेऱ्या होतील. आणि त्यानंतर विशेष फेऱ्या राबविण्यात येईल. यंदा प्रवेश प्रक्रियेत काहीसा बदल केलेला आहे. यापुर्वी विशेष फेऱ्यांमध्ये प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य अशी पद्धत होती. परंतु यंदा विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारेच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे शेवटच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश होईपर्यंत विशेष फेऱ्या होतील, त्यामुळे आत्ताच अशा किती फेऱ्या होतील, हे सांगता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com