सांगा, आम्ही जगायचं कसं; कोरोनाने मृत्यू झालेल्या गुरुजींच्या पत्नीचा सवाल 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

आता, तुम्हीच सांगा, अशा परिस्थितीत आम्ही जगायचं कसं, असा सवाल इंदापूर तालुक्‍यातील अशोकनगर जिल्हा परिषद शाळेतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संतोष खुटाळे गुरुजींच्या पत्नी सविता खुटाळे यांनी केला आहे. 

पुणे - गुरुजींना मुलांना शिकवायचं सोडून, गावातील कुटुंबांचे कोरोनाचे सर्वेक्षण करायचे काम दिले. गुरुजींनी तेही काम सुरू केले. अन्‌ सर्वे करता-करताच एके दिवशी त्यांना अचानक ताप आला. कोरोना टेस्ट घेतली आणि त्यात ते पॉझिटिव्ह आले. बारामतीतील एका खासगी रुग्णालयात दहा-बारा दिवस उपचार केले. उपचारासाठी गुरुजींनी आतापर्यंत जमवून ठेवलेली सर्व पुंजी खर्ची घातली. पण त्यांना वाचविण्यात यश आले नाही. सेवेत असताना मृत्यू होऊनही प्रशासनाकडून आतापर्यंत कसलाच ना आर्थिक आधार मिळाला, ना कोणी सांत्वन केले. आता, तुम्हीच सांगा, अशा परिस्थितीत आम्ही जगायचं कसं, असा सवाल इंदापूर तालुक्‍यातील अशोकनगर जिल्हा परिषद शाळेतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संतोष खुटाळे गुरुजींच्या पत्नी सविता खुटाळे यांनी केला आहे. 

कै. संतोष खुटाळे हे इंदापूर तालुक्‍यातील बेलवडीचे. त्यांना ना शेतीवाडी, ना घरदार. जगण्यासाठी अन्य कोणतेही साधन नाही. पत्नी सविता खुटाळे यांचे दहावीपर्यंत शिक्षण झालेलं. पदरात दोन मुली. मोठी बारावीत, तर छोटी सातवीच्या वर्गात आहे. त्यांच्या कुटुंबापुढे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ही झाली प्रातिनिधिक प्रतिक्रिया. कारण कोरोनाचे सर्वेक्षण करत असताना जिल्हा परिषद शाळेतील अन्य दोन आणि माध्यमिक शाळेतील दोन अशा एकूण पाच शिक्षकांचा कोरोनाचे सर्वेक्षण आणि कोविड सेंटरवर कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या अन्य प्राथमिक शिक्षकांमध्ये इंदापूर तालुक्‍यातील शिंगाडेवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील सोपान कांबळे आणि मावळ तालुक्‍यातील एका शिक्षकाचा समावेश आहे. शिरूर आणि इंदापूर तालुक्‍यातील प्रत्येकी एका माध्यमिक शिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंदापूर तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळांमधील दोन शिक्षकांचा कर्तव्यावर असताना कोरोनाने मृत्यू होऊनही अद्याप त्यांना जिल्हा परिषद किंवा राज्य सरकारकडून कसलाही आर्थिक आधार मिळालेला नाही. जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या 50 लाखांच्या विम्याचे काय झाले, हेही कळत नाही. या कुटुंबीयांना मदत मिळावी. 
- नानासाहेब नरुटे, अध्यक्ष, इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्हा परिषद शाळांमधील तीन शिक्षकांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. या तिन्ही शिक्षकांचे कोरोना काळातील विम्याबाबतचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. पुढील कार्यवाहीसाठी ते प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत. 
- सुनील कुऱ्हाडे, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, पुणे. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Question of the wife of a Zilla Parishad school teacher who died by Corona