

ब्रिटनमध्ये वर्णद्वेषाच्या
घटनांमध्ये मोठी वाढ
आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक
लंडन, ता. ५ (पीटीआय) : ब्रिटनमधील राष्ट्रीय आरोग्य सेवेत (एनएचएस) वर्णद्वेषाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, श्र्वेतवर्णीय नसलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. ‘सोसायटी ऑफ रेडिओग्राफर्स’ने (एसओआर) आपल्या सदस्यांच्या कामाच्या ठिकाणच्या अनुभवांवर आधारित हे सर्वेक्षण केले आहे.
गेल्या १८ महिन्यांत स्थलांतरितांविरोधी वक्तव्यांमुळे अशा घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे सदस्यांनी सांगितले. काही रुग्णांनी बिगर-श्वेतवर्णीय डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार दिल्याचेही या संस्थेने उघड केले आहे. ‘एसओआर’चे कार्यकारी संचालक डीन रॉजर्स म्हणाले, की गेल्या दीड वर्षात वर्णद्वेषाच्या घटनांमध्ये झालेली वाढ अस्वीकारार्ह असून, हे समाजाचे विदारक चित्र आहे. ‘एनएचएस’मध्ये वैविध्यपूर्ण कर्मचारी वर्ग असून, ती त्यांची ताकद आहे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव, छळ किंवा वर्णद्वेष खपवून घेतला जाणार नाही. ‘एनएचएस’मधील १५ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांत भारतीय कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक असून, सुमारे ४५ हजार भारतीय तिथे कार्यरत आहेत. मिडलँड्स भागात काम करणाऱ्या एका आशियाई वंशाच्या सोनोग्राफरने सांगितले की, स्कॅनिंग दरम्यान अनेक रुग्णांनी ‘बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे देश पूर्वीसारखा राहिला नाही, हे लोक आमच्या नोकऱ्या हिरावून घेत आहेत,’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमांतील वक्तव्यांमुळे लोक आता उघडपणे आपली मते व्यक्त करत असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘एनएचएस’मधील सुमारे २१ टक्के कर्मचारी हे ब्रिटिश वशांचे नाहीत. या सर्वेक्षणानंतर ‘एसओआर’ने आता वर्णद्वेषाच्या घटनांची नोंद ठेवण्यासोबतच त्यावर होणाऱ्या कारवाईवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजिन’नेही (बापिओ) या वर्णद्वेषी वर्तनाचा तीव्र निषेध केला आहे. अल्पसंख्याक डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी ‘एनएचएस’च्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावत असून, त्यांना आदराची वागणूक मिळणे आवश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.