

राहुल गांधी यांचे
‘आस्क मी एनीथिंग’
नवी दिल्ली, ता. ६ (पीटीआय) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘जेन झी’शी संवाद साधण्यासाठी गुरुवारी ‘इन्स्टाग्राम’वर ‘आस्क मी एनीथिंग’ (मला काहीही विचारा) हे सत्र आयोजित केले होते. या सत्रात त्यांनी झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनासह विविध प्रश्नांना उत्तरे दिली. ‘‘प्रत्येक सरकारने विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे,’’ असे आग्रही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
राहुल गांधी यांनी ‘इन्स्टाग्राम स्टोरीज’च्या माध्यमातून तरुणांना प्रश्न विचारण्याचे आवाहन केले होते. या उपक्रमाची लिंक ‘एक्स’वर शेअर करताना गांधी म्हणाले, ‘‘विद्यार्थी आणि तरुण मित्रांनो, मी तुमचे म्हणणे ऐकण्यासाठी येथे आहे. मला इन्स्टाग्रामवर काहीही विचारा, मी जास्तीत जास्त प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन.’’ काँग्रेसने राहुल यांनी दिलेल्या उत्तरांच्या दोन चित्रफिती प्रसिद्ध केल्या आहेत.
झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर गांधी म्हणाले, ‘‘देशात सुरू असलेली विद्यार्थी आंदोलने ही शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात आहेत. मी कोटा आणि डेहराडूनमध्ये हे स्पष्टपणे सांगितले आहे आणि अलाहाबादमध्येही सांगेन की, आपली शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. ती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची आणि जाचक आहे. केंद्र सरकार असो, काँग्रेसचे सरकार असो किंवा झारखंडमधील सरकार, प्रत्येक सरकारने विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून शिक्षण व्यवस्थेत बदल करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.’’
झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील कथित गैरप्रकारांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा गुरुवारी १३ वा दिवस होता. सहा आंदोलक उपोषणावर असून, आंदोलक विद्यार्थी आणि नोकरी इच्छुकांनी राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी ११ सदस्यांचे शिष्टमंडळ तयार केले आहे. २५ जुलैपासून सुरू झालेले हे आंदोलन राज्यातील सर्वांत मोठे विद्यार्थी आंदोलन ठरले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.