अमली पदार्थाच्या कारखान्यावर छापा

अमली पदार्थाच्या कारखान्यावर छापा

पुणे - दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) जुहू युनिटने दिवे (ता. पुरंदर) येथील एका कारखान्यावर बुधवारी (ता. १९) रात्री उशिरा छापा टाकून तब्बल १४ किलो ३०० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत पाच कोटी ६० लाख ६० हजार रुपये इतकी आहे. या कारखान्यावर अशाच प्रकारची कारवाई विलेपार्ले येथेही नुकतीच करण्यात आली. दरम्यान, एटीएसने याप्रकरणी दोघांना आधीच अटक केली होती. 

महेंद्र परशुराम पाटील (वय ४९) व संतोष बाळासाहेब आडके (वय २९) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल केला आहे. ‘एटीएस’च्या जुहू युनिटचे पोलिस निरीक्षक दया नायक व पोलिस उपनिरीक्षक सागर कुंजीर यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वी मुंबईत मेफेड्रॉनची विक्री केल्याप्रकरणी पाटील व आडके यांना अटक केली होती. त्यांची चौकशी केल्यानंतर आडके याचा मेफेड्रॉन निर्मितीचा कारखाना असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, ‘एटीएस’च्या पथकाने न्यायवैद्यकीय रासायनिक प्रयोगशाळेच्या पथकाच्या मदतीने बुधवारी दुपारी बारा वाजता दिवे येथील चिंचावले मळ्याजवळील ‘श्री अल्फा केमिकल्स’ या कारखान्यावर छापा टाकला. तेथे रात्री बारा वाजेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती. तेथून पोलिसांनी चार कोटी दोन लाख रुपये किमतीचे साडेदहा किलो मेफेड्रॉन जप्त केले. याबरोबरच कारखान्यासह अन्य मालमत्तेची किंमत एक कोटी दोन लाख रुपये इतकी आहे. याबरोबरच विलेपार्ले येथूनही मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. 

‘एटीएस’चे अतिरिक्त पोलिस महासंचालक देवेन भारती, पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, पोलिस उपायुक्त विक्रम देशमाने, डॉ. विनयकुमार राठोड, सहायक पोलिस आयुक्त श्रीपाद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायक, कुंजीर, दशरथ विटकर, सचिन पाटील, पोलिस निरीक्षक रावळ यांच्यासह न्याय वैद्यकीय रासायनिक प्रयोगशाळेचे उपसंचालक राजेंद्र कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक रासायनिक विश्‍लेषक डॉ. कीर्ती वडके, वैज्ञानिक सहायक शरद पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

... तर ८० कोटींचा मेफेड्रॉन बाजारात असता!
कारवाईच्या ठिकाणी पोलिसांना मेफेड्रॉन निर्मितीसाठी लागणारे रसायन मोठ्या प्रमाणात जप्त केले. अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये एक किलो मेफेड्रॉनची किंमत अंदाजे ४० लाख इतकी आहे. जप्त केलेल्या या रसायनापासून तब्बल २०० किलो मेफेड्रॉन तयार झाला असता. ही कारवाई झाली नसती, तर ८० कोटी रुपयांचे मेफेड्रॉन बाजारामध्ये विक्रीसाठी आणला गेला असता.

काय आहे मेफेड्रॉन ? 
कोकेन, ब्राऊन शुगर याप्रमाणेच मेफेड्रॉन हा एक उत्प्रेरक अमली पदार्थ आहे. २०१५ पासून या रासायनिक पदार्थावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये बंदी आहे. मेफेड्रॉनची निर्मिती, जवळ बाळगणे व विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे गुंगी येऊन माणसाच्या मज्जासंस्थेवर, मनोव्यापारावर परिणाम होतो. शहरांमध्ये होणाऱ्या रेव्ह पार्ट्यांमध्ये याचा सर्रास वापर होतो. तरुणाई या व्यसनाच्या आहारी पडत असल्याची सद्यःस्थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com