कोरोनाच्या संकट काळातही वेश्याव्यवसाय; पुणे-नगर रोडवरील लॉजवर छापा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

कोरोना चे भयानक संकट उभे असतानाही पुणे - नगर रस्त्यावरील एका गावात जुजबी लॉज थाटून बंगाली मुली आणून वेश्याव्यवसाय चालू असल्याचा प्रकार पोलिसांच्या छाप्यात उघड झाला.

शिरुर : कोरोना चे भयानक संकट उभे असतानाही पुणे - नगर रस्त्यावरील सरदवाडी (ता. शिरुर) या, भेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या गावात जुजबी लॉज थाटून बंगाली मुली आणून वेश्याव्यवसाय चालू असल्याचा प्रकार पोलिसांच्या छाप्यात उघड झाला. या प्रकरणी शिरुर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, शिरुर न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी दिली. पारस बस्तीमल परमार (रा. खराडी, पुणे) व रामप्रसाद पंडित तरटे (रा. कारेगाव, ता. शिरुर) अशी अटक किल्ल्यांची नावे असून,  परमार याच्या मालकीचा हा लॉज होता. तर, तरटे हा तेथे व्यवस्थापक म्हणून काम पाहात होता, असे पोलिसांनी सांगितले. 

कोरोना चे संकट अवघ्या जगासमोर उभे ठाकले असतानाही सरदवाङी येथे 'संगम लॉज' उभारून तेथे बंगाली मुली आणून बेकायदा वेश्याव्यवसाय केला जात असल्याची माहिती मिळाल्याने शिरुर चे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे, पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे; तसेच मुकुंद कुडेकर, रेश्मा शेख व दीपक नागरे या पोलिस पथकाने काल पहाटे सापळा रचला. तपासाच्या नियोजनानूसार एक 'बनावट ग्राहक' संबंधित लॉजवर पाठवून खात्री केली असता, चार बंगाली मुली आणून परमार व तरटे हे त्यांच्या मार्फत वेश्या व्यवसाय करीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पहाटे सहाच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला.

हे वाचा - नवरा-बायकोचं घरच्या हिशोबावरून भांडण; प्रकरण पोहोचलं पोलिसांपर्यंत

परमार हा मूळचा राजस्थानातील मारवाड येथील; तर तरटे हा बीड जिल्ह्यातील चिंचाळा येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या विरुद्ध स्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये  गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनास्थळाहून त्यांना अटक केली असल्याचे पोलिस निरीक्षक खानापुरे यांनी सांगितले.

'कोरोना' काळात अधिक गांभीर्याने वागण्याची गरज असताना, काही विघातक शक्ती कायदा हातात घेऊन बेकायदा धंदे करीत आहेत. तर, इतर लोक त्याला बळी पडत आहेत. त्यामुळे अशा विघातक शक्तींविषयी जागरूक नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी. त्यांचा बिमोड करण्यासाठी पोलिस भक्कम आहेत. शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुठे काळे धंदे, जुगार, अवैध दारु विक्री किंवा उत्पादन चालू असेल तर त्याची माहिती पोलिसांना कळवावी. संबंधितांना योग्य ते बक्षिस देताना त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल. शिवाय 'असले' धंदे करणारांची पाळेमुळे खणून काढताना त्यांना पाठिशी घालणाऱ्यांनाही कायद्याच्या चौकटीत आणून 'योग्य' धडा शिकवला जाईल.
- प्रवीण खानापुरे, पोलिस निरीक्षक, शिरुर पोलिस स्टेशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raid on lodge on pune nagar road by police