पुणे - पुणे-सातारा लोहमार्गावरील आळंदी स्थानकावर सुमारे ९० कोटी खर्चून नवा ‘कोचिंग डेपो’ बांधण्यात येणार आहे. या डेपोत दिवसाला सुमारे १०० डब्यांची देखभाल आणि दुरुस्ती केली जाईल. हा पुणे विभागातील दुसरा डेपो असेल. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ आणि ‘एनएमजी’ (न्यू मॉडिफाइड गुड्स)च्या डब्यांची देखभाल, दुरुस्तीही याच डेपोत केली जाईल.
पुणे स्थानकावर जागेची कमतरता असल्याने रेल्वे प्रशासन आता विविध प्रकल्पांसाठी पुण्याच्या जवळच्या जागेचा शोध घेत आहे. हडपसर, खडकी टर्मिनलनंतर आता रेल्वे प्रशासन ‘कोचिंग डेपो’साठी आळंदी स्थानकाची निवड केली. स्थानकाजवळ रेल्वेची मोठी जागा उपलब्ध आहे.
उपलब्ध जागेपैकी सुमारे १० एकर जागेवर हा डेपो बांधण्यात येणार आहे. येथे ‘पिट लाइन’, ‘स्टेबलिंग’ व ‘सिक लाइन’ तयार केली जाणार आहे. पुणे विभागाच्या प्रस्तावाला मध्य रेल्वेने मंजुरी दिली असून, अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव रेल्वे बोर्डाला सादर केला आहे. रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळताच, याला निधी मिळेल. यानंतर कामाला सुरुवात होईल.
क्षमता व रेल्वेगाड्यांची संख्या वाढेल
सध्या २३ रेल्वेगाड्याच्या ‘रेक’ची देखभाल व दुरुस्ती पुण्यात होते. नवीन डेपो झाल्यावर या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. गाड्यांची संख्या वाढल्यास त्याचा थेट फायदा प्रवाशांना होणार आहे.
‘जेसीएमसी’चा ताण हलका होणार
पुणे स्थानकाच्या जवळ असलेल्या ‘घोरपडी कोचिंग मेंटेनन्स कॉम्प्लेक्स’(जेसीएमसी)मध्ये दररोज सुमारे ३०० डब्यांची देखभाल व दुरुस्ती केली जाते. येथे ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या डब्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी विशेष डेपोचे काम सुरू आहे.
भविष्यात पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. तेव्हा ‘जेसीएमसी’वर ताण येण्याची शक्यता आहे. मात्र आळंदीला ‘कोचिंग डेपो’ सुरू झाल्यावर हा ताण कमी होईल.
आळंदी स्थानकावर नवीन ‘कोचिंग डेपो’ बांधण्यात येणार आहे. या डेपोमुळे डब्यांची देखभाल व दुरुस्ती अधिक प्रमाणात होईल. ‘घोरपडी कोचिंग मेंटेनन्स कॉम्प्लेक्स’वरचा ताण हलका होईल. सध्या याचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
- पद्मसिंह जाधव, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे
दृष्टिक्षेपात...
खर्च किती - ९० कोटी
दररोज डब्यांची देखभाल व दुरुस्ती - १००
बांधण्यासाठी जागा - १० एकर