

नवी दिल्ली, ता. १६ ः रेल्वे स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात ‘ई-कोलाय’ जीवाणू आढळल्याचे ताशेरे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (कॅग) ओढले आहेत. रेल्वे बोर्डाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे नमूद करत ‘कॅग’ने रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
रेल्वे स्थानकांतील वॉटर कूलरमधून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये ‘ई-कोलाय’ जीवाणू सापडले असून, स्वच्छतागृहांमध्येही कमालीची अस्वच्छता असल्याचे अहवालात म्हटले आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), भिवंडी रोड, कल्याण आणि लोणावळा या स्थानकांसह दक्षिण रेल्वेतील कोइमतूर, पालक्कड, दक्षिण मध्य रेल्वेतील हैदराबाद आणि पूर्व रेल्वेतील मधुपूर स्थानकांवरील पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. ‘ई-कोलाय’ जीवाणूंमुळे विषबाधा, अतिसार आणि मूत्रपिंड निकामी होण्यासारखे गंभीर आजार होऊ शकतात.
देशभरातील ५१२ स्थानकांवरील प्रवासी सुविधांचा ‘कॅग’ने आढावा घेतला. यामध्ये ८९ टक्के म्हणजेच ४५८ स्थानकांवर किमान आवश्यक सुविधांचा (एमईए) अभाव असल्याचे समोर आले आहे. रेल्वे बोर्डाने एप्रिल २०१८ मध्ये सर्व स्थानकांवर पिण्याचे पाणी, प्रतीक्षा कक्ष, आसन व्यवस्था, फलाटांवरील छप्पर, स्वच्छतागृहे, पंखे आणि पादचारी पुलांसारख्या सुविधा ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, सीएसएमटी, मुंबई सेंट्रल, नवी दिल्ली, हावडा आणि सियालदह यांसारख्या प्रमुख स्थानकांवरही आसन व्यवस्था, स्वच्छतागृहे आणि कचराकुंडी यांसारख्या सुविधांची कमतरता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
‘कॅग’ने दिलेल्या शिफारशीनुसार, रेल्वेने पाणीपुरवठा यंत्रणेची नियमित तपासणी करावी आणि पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता निश्चित मानकांनुसार राखण्यासाठी कडक पावले उचलावीत, असे स्पष्ट केले आहे.
प्रमुख निरीक्षणे
- २०२२-२३ मध्ये रेल्वेच्या आठ विभागांमधील ४९ स्थानकांच्या फलाटांवरील नळांतून आणि २०२३-२४ मध्ये नऊ विभागांमधील ५६ स्थानकांमधून गोळा केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांच्या चाचणी अहवालात ‘टोटल कोलिफॉर्म’(ई-कोलायसह) या जिवाणूंची उपस्थिती आढळली.
- २०२२-२३ मध्ये चार विभागांमधील आठ रेल्वे स्थानकांवर आणि २०२३-२४ मध्ये पाच विभागांमधील ११ स्थानकांवर ‘टोटल कोलिफॉर्म’ व्यतिरिक्त इतर जिवाणूविषयक चाचण्यांचे निष्कर्ष असमाधानकारक होते.
‘कॅग’ने तपासलेली रेल्वे स्थानके
५१२
आवश्यक सुविधा नसलेली स्थानके
४५८
उपनगरी नसलेली रेल्वे स्थानके (एनएसजी)
५,९०८
एनएसजीतील एकूण दैनंदिन प्रवासी रेल्वे (एनएसजी) (२०२३-२४)
७,४२४
या स्थानकांतील एकूण प्रवासी
दोन अब्ज ९२ कोटी ४० लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.