पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक सुरु करण्याची प्रशासनाची तयारी पण..

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

देशातील प्रमुख मार्गांवर रेल्वेच्या 200 गाड्यांची सध्या वाहतूक सुरू आहे. त्यातील 19 गाड्या पुण्यातून ये-जा करतात. तसेच पुण्यातून एकच रेल्वे गाडी सध्या दानापूर मार्गावर धावत आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्या सुरू कराव्यात, अशी प्रवासी संघटनांची मागणी आहे.

पुणे : पुणे- मुंबई मार्गावर रेल्वे वाहतूक सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सांगितल्यास, रेल्वे विभाग त्या बाबतचा निर्णय घेईल. या मार्गावर रेल्वे वाहतूक सुरू करण्यासाठी प्रशासनाची तयारी आहे,'' असे स्पष्टीकरण मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी केले.

 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशातील प्रमुख मार्गांवर रेल्वेच्या 200 गाड्यांची सध्या वाहतूक सुरू आहे. त्यातील 19 गाड्या पुण्यातून ये-जा करतात. तसेच पुण्यातून एकच रेल्वे गाडी सध्या दानापूर मार्गावर धावत आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्या सुरू कराव्यात, अशी प्रवासी संघटनांची मागणी आहे. त्या बाबत विचारणा केली असता, शर्मा यांनी, राज्य सरकारने तसे कळविल्यास रेल्वे निर्णय घेईल, असे स्पष्ट केले. पुणे रेल्वे स्थानकाला पर्याय म्हणून विकसित करण्यात येत असलेल्या हडपसर रेल्वे स्थानकाच्या भूसंपादनाबाबत न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे स्थानकाचे काम पुढील वर्षाअखेर सुरू होण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुणे- मिरज लोहमार्ग विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. पुढील वर्षी जूनअखेर पुणे विभागातील विद्युतीकरणाची सर्व कामे पूर्ण होतील, असेही त्यांनी सांगितले.

कबुतर उठले जीवावर ! पुण्यात अल्पवयीन मुलावर तिघांनी केले कोयत्याने वार

कोरोनाच्या काळात प्रवासी वाहतूक बंद असली तरी, रेल्वेद्वारे होणारी मालवाहतूक गेल्या वर्षीच्या तुलनेत 33 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. ऑटो हब असलेल्या पुण्यातून रेल्वेद्वारे बांगलादेशामध्येही गाड्या पोचविण्यात येत आहेत. तसेच मालवाहतूक 13 राज्यांत पुणे विभागाने केली असून जीवनावश्‍यक वस्तूंची सुमारे 970 टन वाहतूक झाली आहे, अशी माहिती शर्मा यांनी दिली. सुरू असलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये सुरक्षिततेची पुरेशी काळजी घेऊन प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे. रेल्वे स्थानकात दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरणाची मोहीम राबविली जाते. कोरोनाच्या काळात रेल्वेने पुणे विभागातून 144 श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्या सोडल्या. त्यातून एक लाख 80 हजार प्रवाशांची वाहतूक झाली, अशी माहिती त्यांनी दिली. या प्रसंगी अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक सुनील बाजपेयी, वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, वरिष्ठ वाहतूक व्यवस्थापक डॉ. स्वप्निल निला, जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर आदी उपस्थित होते.

सांगा, 'एवढे' बिल कसे भरावयाचे ? पुण्यात वीजबिलांचा गोंधळ काही केल्या मिटेना!

रेल्वेचा पुणे विभाग म्हणतो.....
- रेल्वे सुटण्यापूर्वी 3 तासच प्रवाशांना स्थानकावर प्रवेश
- स्थानकाच्या आवारात बॅगांचे निर्जंतुकीकरण करणे प्रवाशांसाठी ऐच्छिक
- पुणे स्थानकाचे रिमॉडेलिंगचे काम कोरोनामुळे मंदावले, दोन वर्ष लागणार
- मालवाहतूक वाढविण्यासाठी रेल्वेचा बिझिनेस प्लॅन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: railway will take decision If the state government wants to start train services on the Pune-Mumbai route