
Pune Rain Update : पुण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा
पुणे : शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच पुढील चोवीस तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याच काळात घाट माथ्यावर अतिवृष्टी होईल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. मागील आठवड्याभरापासूनच राज्यभरात मॉन्सून सक्रिय झाला असून, मंगळवारी (ता.१२) शहर व परिसरातच पावसाचा जोर आणखी वाढला होता. बुधवारी मात्र पावसाने यंदाच्या मोसमातील नवे उच्चांक प्रस्थापित केले. सहा तासात म्हणजे सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच पर्यंत तब्बल ४५ मिलिमीटर पाऊस पडला. दुपारनंतर मात्र पावसाचा जोर काहीसा कमी पडला. बुधवारी पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंतची पर्जन्यमानाची आकडेवारी एकत्र केली तर सरासरी ७० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडल्याचे निदर्शनास आले आहे. गुरुवारी (ता.१४) हेच प्रमाण दिवसभरात १०० मिलिमीटरच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
ओरिसाच्या दक्षिण किनारपट्टीवर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा, दक्षिणेकडील द्रोणीय स्थिती आणि अरबी समद्राहून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा जोर कायम आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर तरी पावसापासून सुटका मिळणार नाही, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
पावसाने सरासरी ओलांडली
जिल्ह्यातील मोसमी पर्जन्यमानाने मागील ‘बॅकलॉग’ भरत सरासरी ओलांडली आहे. मॉन्सून दाखल झाल्यानंतर दरवर्षी १३ जुलै पर्यंत सामान्यतः २३१.३ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षीत असते. यंदा हेच पर्जन्यमान २६०.७ मिलिमीटरवर गेले आहे. म्हणजे सर्वसामान्य पर्जन्यमानापेक्षा २९.४ मिलिमीटर अधिक पाऊस पडला आहे. मागील आठवड्यापर्यंत जिल्ह्यात सामान्य पर्जन्यमानापेक्षा कमी पाऊस पडला होता. आठवडाभरातच मॉन्सूनच्या पावसाने सरासरी ओलांडली आहे.
अशी ओळखा पावसाची श्रेणी
शब्दावली - पाऊस (मि.मी.)
खूप हलका पाऊस - २.४ पर्यंत
हलका पाऊस - २.५ ते १५.५
मध्यम पाऊस - १५.६ ते ६४.३
मुसळधार पाऊस - ६४.५ ते ११५.५
खूप मुसळधार पाऊस - ११५ ते २०४.४
अतिवृष्टी - २०४.५ पेक्षा जास्त
पुण्यातील पाऊस (बुधवारी सकाळी ८ः३० ते संध्याकाळी ६ वा. पर्यंत)
शिवाजीनगर - ४६.४
पाषाण - ५६.८
लोहगाव - ४६.८
चिंचवड - ५४.०
लवळे - ४९.५
मगरपट्टा - ३७.५